INX Media Case / अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याच्या 27 तासांनंतर पी.चिदंबरम आले समोर; म्हणाले - माझ्यावर कोणतेही आरोप नाहीत

माझ्या विरोधात आरोपपत्र दाखल केले नाही, मला आणि मुलाला यात फसवण्यात आले -  चिदंबरम
 

Aug 21,2019 10:26:42 PM IST

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायलयाने दोन वेळा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पी.चिदंबरम बुधवारी संध्याकाळी पहिल्यांदाच काँग्रेस मुख्यालयात दाखल झाले. यावेळी चिदंबरम म्हणाले की, राज्यघटनेचा पाया स्वातंत्र्यात असल्याचा मला विश्वास आहे. संविधानाच्या कलम 21 मध्ये मला जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला आहे. मला जर जीवन आणि स्वातंत्र्यापैकी एक निवडायचे असेल तर मी स्वातंत्र्याची निवड करेन.

आरोपपत्रही दाखल करण्यात आले नाही - पी चिदंबरम

आयएनएक्स मीडिया केसमध्ये माझ्यावर किंवा कुटुंबातील सदस्यांवर कोणतेही आरोप करण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर याबाबत तपास यंत्रणांनी आरोपपत्रही दाखल केले नाही. मी काही चुकीचे केले असल्याचे एफआयआर मध्ये सांगण्यात आले नाही. मला आणि माझ्या मुलाल या प्रकरणात फसवण्यात आले आहे. उच्च न्यायालयाने मला अटकेपासून अंतरिम दिलासा दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने माझा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला.

वकिलांसोबत सुनावणीची पूर्वतयारी करत होतो

माझ्या वकिलांनी मला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. कायद्यापासून पळून जात असल्याचा माझ्यावर आरोप करण्यात आला आहे. पण गेल्या 24 तासांपासून मी माझ्या वकिलांसोबत सुनावणीची पूर्वतयारी करत होतो. माझ्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचे माझ्या वकिलांनी सांगितले. आता शुक्रवारपर्यंत मी ताठ मानेने जगू शकतो. मी कायद्याचा सन्मान करतो. तपास यंत्रणांनी सुद्धा कायद्याने पालन करावी एवढीच मी प्रार्थना करतो.

X