आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • P Chidambaram INX Media Case Live; P Chidambaram Bail Plea Rejected By Supreme Court

INX प्रकरणः चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ, 30 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयएनएक्स घोटाळा प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या सीबीआय कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. सीबीआयच्या कोठडीत असताना त्यांना शेवटच्या दिवशी अर्थात 26 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर करण्यात आले. यामध्ये सीबीआय कोर्टात त्यांच्याविरोधात सविस्तर चौकशी करण्यासाठी आणखी काही दिवसांची मुदत मागण्यात आली. त्यानंतर सीबीआयला आणखी 4 दिवसांची मुदतवाढ मिळाली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 30 ऑगस्ट रोजी होणार आहे.


तत्पूर्वी सुप्रीम कोर्टाने पी. चिदंबरम यांची याचिका सोमवारी फेटाळून लावली आहे. माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी अंतरिम जामीनासाठी यापूर्वी दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता. ती फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली होती. आता सुप्रीम कोर्टाने सुद्धा चिदंबरम यांना दणका दिला. सुप्रीम कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी स्पष्ट केले की चिदंबरम यांना आधीच अटक झाली आहे. आता जुन्या अंतरिम जामीनाच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही. त्यामुळे, चिदंबरम यांना नव्याने नियमित जामीन याचिका दाखल करावी लागणार आहे.


चिदंबरम यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आणि काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी जस्टिस भानुमती यांच्या बेचसमोर जामीन याचिकेचा उल्लेख केला होता. आपल्या याचिकाकर्त्याची याचिका सुनावणीसाठी यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाही असेही ते म्हणाले होते. त्यावर सुप्रीम कोर्टाच्या रेजिस्ट्रारने आवश्यक पावले उचलणे आणि याचिका यादीत समाविष्ट करण्यास सांगितले. तर दुसरीकडे, अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) सुप्रीम कोर्टात शपथपत्र सादर केला. त्यानुसार, चिदंबरम आणि आयएनएक्स मीडिया घोटाळ्यातील सह-आरोपींनी अर्जेण्टीना, ऑस्ट्रिया, ब्रिटिश व्हर्जिन बेट समूह, फ्रान्स, ग्रीस, मलेशिया, मोनॅको, फिलीपाइन्स, सिंगापूर, दक्षिण आफ्रीका, स्पेन आणि श्रीलंकेत संपत्ती गोळा केली. ईडीने सांगितल्याप्रमाणे, या संबंधित विशिष्ट माहिती आर्थिक गुप्तचर शाखेकडून मिळवण्यात आली होती.

काय आहेत आरोप?
चिदंबरम यांनी कथितरित्या अर्थमंत्री असताना लाच घेऊन आयएनएक्सला फायदा करून दिला. या कंपनीला त्यांनी 2007 मध्ये 305 कोटी रुपये घेण्यासाठी परदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाची मंजुरी मिळवून दिली होती. ज्या कंपन्यांना फायदा झाला त्यांना चिदंबरम यांचे पुत्र आणि खासदार कार्ती चिदंबरम चालवत होते. सीबीआयने 15 मे 2017 रोजी या प्रकरणात खटला दाखल केला होता. 2018 मध्ये ईडीने सुद्धा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी खटला दाखल केला. एअरसेल-मॅक्सिस डीलमध्ये सुद्धा चिदंबरम आरोपी आहेत. यामध्ये सीबीआयने 2017 मध्ये एफआयआर दाखल केला होता.

बातम्या आणखी आहेत...