आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुलंच्या ‘वंदे मातरम’चे दुर्मिळ फुटेज लागले हाती; स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रदर्शित झाला होता चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वंदे मातरम चित्रपटाचे फुटेज सतीश जकातदार यांनी चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांना सुपूर्द केले. - Divya Marathi
वंदे मातरम चित्रपटाचे फुटेज सतीश जकातदार यांनी चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांना सुपूर्द केले.

पुणे - देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लगेच निर्माण झालेल्या ‘वंदे मातरम’ या मराठी चित्रपटात अनेक योग जुळून आले होते. महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे यांच्या दर्जेदार अभिनयाची जुगलबंदी प्रथमच या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. गदिमांचे लेखन, पटकथा, संवाद आणि गीतलेखन सर्वार्थाने या चित्रपटात बहरले होते. राम गबालेंचा हा पहिलाच मोठा दिग्दर्शकीय प्रयत्न होता. सर्वत्र देशप्रेमाचे वारे होते. या पार्श्वभूमीवरील हा चित्रपट मराठी चित्रपटांच्या इतिहासात महत्त्वाचा मानला जातो. मात्र, आजवर या चित्रपटाचा मागमूसही लागला नव्हता. 


चित्रपटाचे ज्येष्ठ अभ्यासक, संग्राहक सतीश जकातदार यांच्या संग्रहातील काही जुन्या व्हीएचएस साठ्यांचा तपास करताना अचानक वंदे मातरम या चित्रपटातील काही फुटेज असलेली व्हीएचएस कॅसेट सापडली. त्यामध्ये चित्रपटातील काही प्रसंगांचे चित्रीकरण आहे. त्याचप्रमाणे पुलंचे भाचे दिनेश ठाकूर यांनी पुलंच्या पेटीवादनाचा एक दुर्मिळ व्हिडिओदेखील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सुपूर्द केला आहे. चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी ही माहिती दिली. 


‘वंदे मातरम चित्रपट १९४८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर त्याची एकही रीळ उपलब्ध होत नव्हती. आता किमान ३७ मिनिटांचे फुटेज उपलब्ध झाले आहे. या फुटेजमध्ये चित्रपटात पुल पोवाडा गायन करतात, तो प्रसंग चित्रित करण्यात आला आहे. पुल, गदिमा आणि  सुधीर फडके (वंदे मातरम चित्रपटाला फडके यांचे संगीत होते) यांच्या जन्मशताब्दी वर्षांतच हे फुटेज सापडावे हा अपूर्व योग आहे,’ असेही मगदूम म्हणाले. वंदे मातरमची निर्मिती पी. आर. भिडे (स्वामी विज्ञानानंद) यांनी केली होती.
 

पुलंच्या पेटीवादनाचा दुर्मिळ व्हिडिओ
१९८० च्या सुमारास पु. ल. देशपांडे यांनी खासगी कार्यक्रमात केलेल्या पेटीवादनाचा दुर्मिळ व्हिडिओदेखील दिनेश ठाकूर यांनी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे जतनासाठी दिला आहे. पुलंना त्या वेळी तबल्यावर लालजी देसाई यांनी संगत केली आहे. तसेच पुलंच्या आवाजातील काही भाषणे, व्यक्तिचित्रणेही ठाकूर यांनी संग्रहालयाकडे सुपूर्द केली आहेत. 
 

बातम्या आणखी आहेत...