आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खूप काही शिकवणारा प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्र. मु. काळे  

आयुष्याचा रस्ताही अनेक अनुभव घेत पुढे जाण्यासाठी आहे. यात आशा-निराशा, उमेद -हताशा, चांगले-वाईट सुख-दुःख असे परस्परविरोधी रंग असणारच आहेत. या प्रवासातही विचित्र वागणारे सहप्रवासी सोबत असतीलच...


असाच एक रविवार. मी व मित्र सुनील लोखंडे कुठलेही नियोजन नसताना अचानक शनिशिंगणापूरला जाण्यासाठी निघालो.फोन   करून चौकशी केली होती. सकाळी आठ वाजता बस होती.पत्नीने सांगितले की जास्त वेळ वाट पाहू नका, दुसरा पर्याय शोधा. साडेसात वाजता महामार्ग बसस्थानक गाठले. सुनील थोड्या वेळाने आला, पण बस कुठे होती? चौकशी केली तर येईल-येईल अशी उत्तरे मिळाली. आठाचे नऊ वाजून गेले तरीही तीच उत्तरे! साडेनऊला पुन्हा चौकशी करायला गेलो तर  कंट्रोलर साहेबांनी दुसरा पर्याय शोधण्यास सांगितले. शिर्डी बस लागली होती. बसमध्ये बसलो, पण कंडक्टरने प्रिंटिंग होत नसल्याचे सांगत पैसे घेतल,े पण तिकीट अर्ध्या तासाने दिले.

शिर्डीला उतरल्यावर डायरेक्ट बस नव्हती. जीपने जावे म्हणून बसलो. तेवढ्यात एक मोठा ग्रुप आला आणि चालकाने तुम्हाला दुसऱ्या गाडीत बसवून देतो म्हणत उतरवून दिले. शेवटी अर्ध्या तासाने दुसरी गाडी मिळाली. गाडीत एक कौटुंबिक ग्रुप बसला होता. शनिशिंगणापूर आले. गाडीचालकाने एक तास वेळ दिला होता, त्याच गाडीने परत शिर्डीला जायचे होते. आम्ही दर्शन घेतले एका हॉटेलमध्ये नाष्टा-चहा घेतला. दुपारचे चार वाजले होते. घाईने गाडीकडे आलो, पण बरोबरच्या ग्रुपचा पत्ता नव्हता. शेवटी गाडी मंदिराजवळ आणून उभी केली. बऱ्याच वेळाने तो ग्रुप हसत-खेळत गप्पा मारत फोटो काढत आला. त्यावर गाडीचालकाने बरीच बडबड केली. त्यावर ‘सॉरी’ म्हणत सर्वजण गाडीत बसले. गाडी शिर्डीत आली तेव्हा सात वाजले होते. श्रीसाईबाबा मंदिरात गर्दी होती. मुखदर्शनासाठी पास काढले. दर्शन झाले. प्रसाद घेऊन मोबाइल घेऊन निघालो. एका हॉटेलमध्ये नाष्टा-चहा घेतला तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. स्टँडवर आलो. एक जीपचालक प्रवासी गोळा करीत होता, पण एक ग्रुप जास्त भाडे म्हणून नकार देत होता. शेवटी नाशिक बस आली. ती एशियाड बस होती. तिकीट काढताना लक्षात आले की भाडे जास्त आहे. त्यापेक्षा जीपचे दर कमी होते. रात्री साडेदहा वाजता नाशिक आले. सुनील व मी रिक्षाने निघालो. रिक्षा मिळाली घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पत्नीने सारी हकिगत ऐकून तरी तुम्हाला म्हणत होते...म्हणत टोमणा मारलाच.

हा तर छोटा प्रवास होता.  त्यात उशिराबद्दल याला-त्याला दोष देऊन आपण मीच बरोबर असे समर्थन करतो. सहप्रवाशांना त्यांच्या चुका दाखवल्या जातात व त्यामुळे आपले किती नुकसान झाले असा विचार केला जातो.  आयुष्याच्या प्रवासातही असे झाले तसे झाले अनेक तक्रारी करत जीवन जगतो.  


आयुष्याचा हा रस्ताही अनेक अनुभव घेत पुढे जाण्यासाठी आहे. यात आशा-निराशा, उमेद -हताशा, चांगले-वाईट, सुख-दुःख असे परस्परविरोधी रंग असणारच आहेत. 

या गोष्टी बरोबर घेऊनच जीवन जगायचे असते आणि छोट्या-छोट्या आनंदाचा शोध घ्यायचा असतो हेच खरे! या एका दिवसाच्या अचानक केलेल्या प्रवासानं खूप काही शिकवलं. आजही त्यातल्या कुठल्याच सहप्रवाशाबद्दल आमची तक्रार नाही. प्रवास म्हटलं की वेगवेगळ्या स्वभावाची लोकं सोबत असणारच. त्यांच्यासोबत काही त्यांचं-काही आपलं असं अॅडजेस्ट करून चालावंच लागतं. मग कुठल्याही प्रवासाचा त्रास होत नाही. 

लेखकाचा संपर्क : ९२७३०४५७९४
 

बातम्या आणखी आहेत...