आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरत्या वर्षातल्या घडामोडींचे निरूपण...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पी. विठ्ठल  

भिंतीवरचं जुनं कॅलेंडर काढून त्या जागी नवीन लावणे आणि सरत्या रात्रीला निरोप देऊन नव्या सूर्योदयाची किरणे अंगावर घेणे हा आपल्या वार्षिक दैनंदिनीचाच एक भाग असतो. जे घडणार आहे ते घडतंच. त्यात चांगलं- वाईट असणार हे गृहीत असलं तरी इतकं वाईट घडायला नको होतं असं राहून राहून सरतेशेवटी वाटतं. सुख- दु:खाच्या अनिवार्य लाटा उसळत राहतात आणि आपण घटना-घडामोडींचे निरूपण करत राहतो. बरं, प्रत्येक गोष्टीचा थेट आपल्याशी काय संबंध? असं म्हणून यापासून सुटका करून घेता येईलही; पण मग अशा निरर्थक, निर्जीव जगण्याचं आपण काय करायचं, असा प्रश्न उरतोच.
२०१९ सरले. नव्या वर्षाचे स्वागत पुन्हा उत्साहाने करून जे जे वर्षभरात घडेल त्याला सामोरे जायला आपण सज्ज झालो आहोत. म्हणजे त्याशिवाय अन्य कोणताही पर्याय आपल्याकडे नसतोच. भिंतीवरचं जुनं कॅलेंडर काढून त्या जागी नवीन लावणे आणि सरत्या रात्रीला निरोप देऊन नव्या सूर्योदयाची किरणे अंगावर घेणे हा आपल्या वार्षिक दैनंदिनीचाच एक भाग असतो. जे घडणार आहे ते घडतंच. त्यात चांगलं-वाईट असणार हे गृहीत असलं तरी इतकं वाईट घडायला नको होतं असं राहून राहून सरतेशेवटी वाटतं. सुख-दु:खाच्या अनिवार्य लाटा उसळत राहतात आणि आपण घटना-घडामोडींचे निरूपण करत राहतो. बरं, प्रत्येक गोष्टीचा थेट आपल्याशी काय संबंध? असं म्हणून यापासून सुटका करून घेता येईलही; पण मग अशा निरर्थक, निर्जीव जगण्याचं आपण काय करायचं, असा प्रश्न उरतोच.तर असो... २०१९ चा प्रारंभच मुळी यवतमाळ येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या वादाने झाला. ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटनाचे दिलेले निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याचा निर्णय स्वागत मंडळाने घेतला. सांकृतिकदृष्ट्या बरेच प्रगल्भ असलेले आपण नयनतारा यांना पचवू शकलो नाही. हे आपले वैचारिक दारिद्र्यच म्हणावे लागेल. गावगल्लीतले सुमार राजकीय पक्ष आणि त्यांचे निर्बुद्ध कार्यकर्ते ही एक मोठीच समस्या आपल्याकडे आहे. ऊठसूट कोणत्याही प्रश्नांचा सोक्षमोक्ष लावण्याची आत्यंतिक अविचारी घाई या सुमारांना झालेली असल्यामुळे त्यांना लेखक, विचारवंत नि कलावंताच्या थोरपणाचा मागमूसही नसतो. या घटनेने वर्षाच्या सुरुवातीलाच विचारस्वातंत्र्याचा प्रश्न ऐरणीवर आला. आणि मग क्रमाक्रमाने एकेक गोष्टी घडत गेल्या. काही आनंददायी होत्या तर काही अत्यंत दु:खद. या प्रत्येक गोष्टी आपल्या सांस्कृतिक जगण्याच्या अगदीच जवळच्या जरी नसल्या तरी त्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम हे आपल्याला व्यापून असतातच. म्हणजे पुलवामा हल्ल्याने आपण अस्वस्थ झालो. कारण मारले गेलेले सैनिक हे आपल्यापैकीच कुणाचे ना कुणाचे नातलग होते. त्यांचे हे बलिदान विसरता कसे येईल? त्यानंतर पाकव्याप्त काश्मिरात झालेला सर्जिकल स्ट्राइकही आम्हाला बेहद्द आवडला. अशा गोष्टी घडल्या की आमचे राष्ट्रीयत्व एकदम उचंबळून येते. यानंतर आम्ही लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे गेलो. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मोठे यश मिळवले. एवढे मोठे की, या यशाला अद्भुत वगैरे म्हणावे लागले. सोशल मीडियातल्या घनघोर आभासी गप्पा आणि टीव्ही वाहिन्यांवरील राजकीय विश्लेषकांची बोलती बंद करणारा हा निकाल आम्ही अनुभवला. निवडणूकपूर्व वातावरण निकालानंतर एकदम बदलून गेले. सगळे अंदाज, सगळ्या शक्यता, एक्झिट पोल वगैरेची उरलीसुरली विश्वासार्हताही आपण गमावून बसलो. दीड शतकाची परंपरा असलेला काँग्रेस पक्ष आणि त्यांचे समविचारी पक्षाचे अस्तित्वच संपुष्टात येते की काय, अशीही भीती या निकालानंतर निर्माण झाली.  लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षच नसणे ही घटना फार बरी नसते.स्पष्ट बहुमतानंतर सरकारने जम्मू- काश्मीरला घटनेतील ३७० व्या कलमानुसार देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द केला. या निर्णयाचे जगभर पडसाद उमटले. अजूनही तिथले जनजीवन पूर्ववत होऊ शकलेले नाही. पण ३७० चाही आम्हाला आनंद झाला. अनेकांनी काश्मिरात शेती, फार्महाऊस वा बंगले विकत घेण्याचे स्वप्न सोशल मीडियावर बोलून दाखवले. अनेकांनी काश्मिरी मुलींशी लग्न करण्याचे स्वप्नाळू मनसुबे रचले. हे सगळं खूप भयंकर असूनही आम्ही सर्वांनी या चर्चा एन्जॉय केल्या.भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ च्या प्रक्षेपणाने तर आम्ही एकदम भारावून गेलो. हे भारावून जाणे स्वाभाविक होते. रात्रभर आम्ही जागून त्या मोहिमेकडे बघत राहिलो. आमच्या शास्त्रज्ञांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान वाटला. दुर्दैवाने मून लँडरचा संपर्क तुटला; पण तरीही ही कामगिरी  आम्हाला आनंद देऊन गेली. याशिवाय आमच्या देशाची संरक्षण सज्जता वाढवणाऱ्या अनेक गोष्टी पुढे आल्या. याही गोष्टींचा आम्हाला आनंद झाला. शून्य उपासमारीचे जग निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पाहिले. त्यासाठी वेगवेगळी अभियानेही आम्ही राबवली. पण हे लक्ष्य कधी साधता येईल माहीत नाही. अपेक्षा करूया की नव्या वर्षात देशातल्या सर्व गोरगरिबांना पोटभर अन्न आणि सन्मान मिळेल... त्यांचे कुपोषण संपेल.सरत्या वर्षात आपल्या न्यायव्यवस्थेने प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या अयोध्या प्रकरणाचा म्हणजे राममंदिर-बाबरी मशिदीचा तिढा सोडवला. या ऐतिहासिक निकालाने देशातल्या कमालीच्या टोकदार आणि संवेदनशील विषयाचा शेवट झाला. जाती-धर्माच्या नावाने द्वेषाचे राजकारण करू पाहणाऱ्यांना आता नवे प्रश्न खांद्यावर घ्यावे लागतील. हा निकाल सामाजिक सलोख्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल.त्याआधी सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी अभूतपूर्व महापूर अनुभवला. पावसाने उडवलेली दाणादाण विसरता येत नाही. घरादारासह शेतीमातीचे झालेले अतोनात नुकसान आणि माणसांसह पशूंची झालेली जीवितहानी हृदयद्रावक होती. मात्र या वेळी देशभरातून दातृत्वाचे हजार हात पुढे आले, ही सध्याच्या काळातली दिलासादायक बाब. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन अजूनही माणसं मदतीला धावतात हे आजच्या काळात आश्चर्याचेच म्हणायला हवे. कारण आपला भोवताल कधी नव्हे तो अत्यंत गढूळ, प्रदूषित झाला आहे. समूहासमूहातून विस्तवही जात नाही अशी स्थिती आहे. टोकाच्या अस्मिता आपण जपत आहोत. आपापल्या समूहाची सामाजिक आणि राजकीय प्रतीके आपण आकाराला आणली आहेत. महापुरुषांचे विशिष्ट जातीत झालेले विभाजन अत्यंत घातक आहे. त्यांच्या विचारांची व्यापकता आपण समजून घ्यायला तयार नाही आहोत. राजकीय पक्षांच्या विचारधारा जणू अनैतिक मूल्यांवरच उभ्या आहेत. राजकारणाची एक असभ्य आणि भ्रष्ट संस्कृती उदयाला आली आहे, आणि दुर्दैवाने या संस्कृतीने सरत्या वर्षात आपल्याला अधिक छळले आहे. सत्ता हेच एकमेव ध्येय समोर ठेवून पक्षांतराची एक अभूतपूर्व धावपळ या वर्षात आपण अनुभवली. भीती, असुरक्षितता ही कारणेही पक्षांतराच्या मागे आहेतच. एखाद्या शक्तिशाली पक्षाला वा नेत्याला शरण जाणे ही घटना खूप दुर्दैवी आणि लोकशाही मूल्यांचा अवमान करणारी आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या राज्यात प्रचंड गोंधळ झाला. राजकारण किती घाणेरडे आणि बेभरवशाचे क्षेत्र आहे, याची प्रचिती आपल्याला आली. तत्त्व, निष्ठांच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या सर्वच राजकीय पक्षांनी जनादेशाचा आणि मतदाराचा केलेला अवमान भारतीय राजकारणात पहिल्यांदाच पाहायला मिळाला. राष्ट्रपती राजवट काय? भल्या सकाळी शपथविधी काय? आमदारांची हॉटेलवारी काय? नि दररोज टीव्ही वाहिन्यांवरील ब्रेकिंग बातम्या काय? सगळ्या गोष्टींचा उबग या काळात आला. सर्वसामान्य माणसाला या सत्ताकारणाकडे हतबल होऊन बघण्याशिवाय पर्याय नव्हता. हक्क आणि आत्मसन्मानाबाबत जागृत असणारी जनता किती विफल असू शकते हे या काळात आपण अनुभवले.  अखेरीस अनेक तडजोडींनी युक्त महाविकास आघाडीचे सरकार आपल्याला मिळाले. या सरकारकडून भरघोस काहीतरी घडावे ही अपेक्षा अर्थातच आहे. म्हणजे सामाजिक प्रश्नांचा भरघोस डोंगर पुढे असला तरी मराठी भाषेला अद्याप अभिजात दर्जा का मिळाला नाही, याचा शोध घ्यायला हवा. विचारस्वातंत्र्य, सुरक्षितता  आणि स्वावलंबन या गोष्टी आपल्याला लाभतील अशी अपेक्षाही आपण करूयात. याशिवाय स्त्रियांचे, मुलांचे, शेतकऱ्यांचे प्रश्नही हातावेगळे करायला हवेत.
सरत्या वर्षात हैदराबादला एका डॉक्टर तरुणीवर झालेल्या अत्याचाराने समाजमन सुन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरमुळेही देश हादरून गेला. याचदरम्यान उन्नावच्या आमदाराला झालेली जन्मठेप हाही अलीकडेच आलेला एक महत्त्वाचा निकाल. या सगळ्या गोष्टींनी सगळा भोवताल ढवळून निघाला. उजव्या-डाव्यांचा संघर्ष आणि धर्माधिष्ठित राजकारण थांबता थांबत नाही. नव संपर्कमाध्यमांनी माणसाच्या मनोव्यापाराचा केलेला बाजार दिवसेंदिवस वृद्धिंगत होतोय. आभासी जगातल्या बोलण्याला प्रतिष्ठा मिळतेय. सत्तासंबंधांना धरून राहण्यातच अनेक जण आपले हित मानताहेत. बिगर मुस्लिम निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद करून विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाल्यानंतर  उत्तर प्रदेश, आसामसह  देशभर सुरू झालेल्या दंगली, हिंसाचार थांबायला तयार नाही. छोट्या छोट्या गावापर्यंत या आंदोलनाचे लोण पसरले आहे.


 
नवनियुक्त संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ लेखक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ख्रिस्ती असण्यावर टीका करून झालेली आहेच. आता नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे भाषण आपल्याला ऐकायचे आहे. त्यांच्या धर्मगुरू असण्यावर अनेकांनी आक्षेप घेतलाय. खरं तर या सगळ्याच बाबी खूप अस्वस्थ करणाऱ्या आहेत. सरत्या वर्षात श्रीराम लागू, गिरीश कर्नाड, गंगाधर पानतावणे, किरण नगरकर, अविनाश डोळस, गो.मा. पवार, राजा ढाले, कविता महाजन अशा अनेकांना आपण गमावलंय. तर भारतरत्न, ज्ञानपीठ, साहित्य अकादमी असे अनेक महत्त्वाचे सन्मानही या वर्षात दरवर्षीप्रमाणे मिळालेले आहेत. या सर्व घटनांचा आनंद आहेच. आणि आपण या सर्व घटनांचे, गोष्टींचे साक्षीदार आहोत. येणाऱ्या वर्षात सगळं चांगलं घडो. आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली पत वाढो. आणि आपले सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन अधिक प्रगल्भ होवो... ही सद्भावना.

लेखकाचा संपर्क - ९८५०२४१३३२ 
p_vitthal@rediffmail.com