आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक पटेलचे बेमुदत उपोषण 19 दिवसांनी मागे, म्हणाला- हा लढा जिवंत राहून लढायचा आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे (पास) नेते हार्दिक पटेल यांचे पाटीदार आरक्षण, शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेले आमरण  उपोषण बुधवारी संपले. राजद्रोहाच्या आरोपात तुरुंगात असलेले त्यांचे सहकारी अल्पेश कथिरिया यांच्या मुक्ततेची मागणीही त्यांनी केली होती. २५ ऑगस्टपासून हार्दिक यांचे उपोषण सुरू आहे. यादरम्यान त्यांना ७ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल केले होते. उपोषण समाप्तीनंतर केलेल्या त्यांनी  भाषणात सत्तारूढ भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर जहाल टीका केली.


ऐतिहासिक साबरमती आश्रमात जाऊन त्यांनी सूतकताई केली.  उपोषणादरम्यान आपण महात्मा गांधींच्या तत्त्वांना अनुभवल्याचे त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. भगतसिंग यांचा जयजयकार करणारे हार्दिक आता गांधीवादाकडे झुकले आहेत. त्यांना याविषयी माध्यमांनी विचारले असता, ते म्हणाले की, दोन्ही नेत्यांचे लक्ष्य भारताचे स्वातंत्र्यच होते. हार्दिक पटेल यांचे उपोषण समाप्त करताना पाटीदारांचे धार्मिक स्थळ उमिया धामचे प्रमुख प्रल्हाद पटेल, खोडलधामचे अध्यक्ष नरेश पटेल यांची उपस्थिती होती. आपल्या समाजातील या वरिष्ठांच्या आग्रहामुळे आमरण उपोषण मागे घेतल्याचे हार्दिक यांनी सांगितले. सरकारने आमची दखल घेतली नाही तर यातूनही आगामी काळात याचे परिणाम दिसून येतील, असे हार्दिक यांनी म्हटले आहे.  


आपला लढा गरीब शेतकरी व गरीब पाटीदारांसाठी असल्याचे ते म्हणाले. देशातील लोकांनी गुजरातला भेट द्यावी. पर्यटनासाठी नव्हे, तर मोदी आणि शहा यांची हुकूमशाही पाहण्यासाठी लोकांनी राज्यात यावे, असे आवाहन हार्दिक यांनी केले.  पाटीदारांचे नेते सी. के. पटेल म्हणाले की, पाटीदार समुदायात कोणी फूट पाडू नये, यासाठी संघटनेला सजग राहणे गरजेचे आहे.


महत्त्वाकांक्षेसाठी आंदोलन :  केतन पटेल
हार्दिक यांचे माजी सहकारी व भाजप नेते केतन पटेल यांनी म्हटले की, हार्दिक हे पाटीदारांसाठी आंदोलन करत नाहीत. राज्य सरकारने पूर्वीच आंदोलकांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या. तेव्हाच आंदोलन संपणे अपेक्षित होते. हार्दिक स्वत:च्या महत्त्वाकांक्षेसाठी आंदोलन पेटते ठेवत आहेत, अशी टीका केतन यांनी केली. त्यांना यापुढे समर्थन मिळणार नाही.


आरक्षणासाठी आंदोलन सुरू राहील : हार्दिक
गुजरात सरकारने दखल घेतली नाही, याचा अर्थ पाटीदारांनी आेळखावा. त्यांना आपली गरज नाही. ठीक आहे. पण उपोषण मागे घेतले तरीही आरक्षणाचे आंदोलन सुरूच राहील, असे हार्दिक यांनी म्हटले आहे. पाटीदारांसाठी आेबीसी कोट्यात आरक्षण मिळवणारच, असा निश्चय त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, ४ सप्टेंबर रोजी भाजपच्या राज्यातील सरकारने या आंदोलनाविषयी भूमिका मांडली होती. हार्दिक यांचे आंदोलन राजकीय उद्देशांनी प्रेरित आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आंदोलन करत आहेत, काँग्रेसच्या पाठिंब्यावर हे सुरू आहे, असे भाजपने म्हटले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...