आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने भरलेली पेटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या संपून शाळा सुरू झाल्या होत्या. आम्हाला आमचे जुने दिवस आठवले. आज परिस्थिती बदलली आहे. ग्रामीण भागात आता महाविद्यालये निघाली आहेत. त्या काळी प्राथमिक शिक्षणानंतर शहरात किंवा बाहेरगावी जावे लागत होते. शहरातही आजच्यासारखी सुसज्ज अशी वसतिगृहे नव्हती. दोन-चार बोर्डिंग यात दोन हॉल असत. एका हॉलमध्ये सिंगल सतरंजीएवढी जागा एका विद्यार्थ्याला असे. सतरंजीच्या उशाला एक पेटी, तेच कपाट म्हणून वापरण्यात येत होते. ज्यांना बोर्डिंगमध्ये प्रवेश मिळाला नाही, ते 3-4 विद्यार्थी मिळून एक रूम करत असत. रूम म्हणजे चार-पाच पत्र्यांची एक खोली होती. एखाद्या वाड्यात अशा रूमची सोय असायची. कोठे कोठे तर लाइटही नसायची. इथं गैरसोय आहे, पण गैरवर्तन कोणी करत नव्हते. घरमालक-मालकीणबाई आईवडिलांसारखाच जीव लावत. प्रसंगी धाकसुद्धा दाखवत होते. आजची मुले घरच्यांचं ऐकत नाहीत, म्हणून बाहेरच्यांचाही धाक नाही. शाळा सुरू होण्यापूर्वी वडिलांची नातेवाईक, मित्र किंवा ओळखीच्या ठिकाणी खोलीसाठी किंवा बोर्डिंगमध्ये प्रवेशासाठी घाई चालत होती.

आईची घाई मुलांची पेटी भरून देण्यासाठी असायची. स्वच्छ धुतलेले कपडे,साबण, खोबरेल तेलाची बाटली, आरसा, कंगवा, देवाचा लहानसा फोटो इत्यादीसह दोन लहानमोठे डबे आणि एक काचेची बाटली देत असे. मोठ्या डब्यात लाडू आणि लहान डब्यात चटणी असायची. तसेच चार दिवस मुलाला जेवता यावे म्हणून दुधातील पोळ्या अशी मायेने भरलेली पेटी असायची. निघताना आईच्या डोळ्यात दाटून आलेले पाणी, सगळ्यांच्या नजरा चुकवून पदराने डोळे पुसायची. आजकालच्या मुलांना अशी भरलेली पेटी नको असते, तर पैशाने भरलेले पाकीट हवे असते. मात्र आईने भरलेल्या पेटीची सर नोटांनी भरलेल्या पाकिटाला नाही. हे कोणी सांगावे अशी परिस्थितीही नाही.