Home | Sports | ICC Cricket World Cup 2015 | News | Padma Shri, Arjuna Awarded people in the Award selection committee

पुरस्कार निवड समितीत ‘पद्मश्री, अर्जुन’चे मानकरी; एचव्हीपीएमचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, धनराज पिल्ले समितीवर

वैभव चिंचाळकर | Update - Feb 11, 2019, 09:32 AM IST

सर्वोत्तम कार्य करणाऱ्यांचा समावेश  

 • Padma Shri, Arjuna Awarded people in the Award selection committee

  अमरावती- राज्य शासनाद्वारे उत्कृष्ट व प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांसोबतच क्रीडा जीवन गौरव, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा संघटक व जिजामाता पुरस्कार देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या निवड समितीत राज्यातील दोन पद्मश्री, एक अर्जुन व दोन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्या मानकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

  खेळांसाठी आयुष्य वेचणारे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीचे पद्मश्री प्रभाकर वैद्य, भारतीय हाॅकीसाठी महत्तम योगदान देणारे माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले, माजी अॅथ्लीट अर्जुन पुरस्कार विजेत्या रचिता मिस्त्री, बॅडमिंटनपटू शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रदीप गंधे आणि सायकलपटू शिवछत्रपती पुरस्कार विजेते हितेंद्र महाजन यांना यंदाच्या शिवछत्रपती पुरस्कार निवड समितीत स्थान देण्यात आले आहे.


  यात अशासकीय सदस्य म्हणून वैद्य, पिल्ले, मिस्त्री यांचा तर निमंत्रित सदस्य म्हणून प्रदीप गंधे, हितेंद्र महाजन यांचा समावेश असून ही नियुक्ती तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे,अशीही माहिती देण्यात आली आहे. राज्यातील सर्वोत्तम खेळाडू, क्रीडा कार्यकर्ते, तसेच खेळांच्या प्रगतीसाठी सातत्याने सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या खेळाडूं, व्यक्तींना दरवर्षी राज्यातील प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविले जाते. यादरम्यान अशा उत्कृष्ट खेळाडूंची पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी सर्वोत्तम व खेळांचा प्रगाढ अनुभव असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा यंदा निवड समितीत समावेश करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ही पाच सदस्यीय निवड समिती सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करणार आहे.

  सर्वोत्तम कार्य करणाऱ्यांचा समावेश
  आजवर माजी खेळाडूंचा किंवा काही नामांकित खेळाडूंचाच शिवछत्रपती पुरस्कार निवड समितीत समावेश केला जायचा परंतु, ६ फेब्रु. २०१९ च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अध्यादेशानुसार २०१७-१८ या वर्षातील पुरस्कार निवड समितीत सर्वच दिग्गज पद्मश्री, अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा समावेश करण्यात आल्यामुळे सर्वोत्तम खेळाडूंनाच न्याय मिळेल, अशी आशा आहे.

Trending