आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवर्षीप्रमाणे यंदाही पद्मश्री पुरस्कारांच्या यादीत बाॅलीवूडच्या काही कलाकारांचा समावेश आहे. मात्र एका कलाकाराच्या नावाला देशभरातून विरोध केला जात आहे. पाकिस्तानातून आलेले आणि भारतीय नागरिक बनलेले गायक अदनान सामी यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देशातील अनेक भागातून विरोधाचा सूर उमटत आहे. त्यांना राजकीय, सोशल मीडियावर आणि सार्वजनिकरीत्या प्रतिक्रियांचा सामना करावा लागत आहे. सीएएचा मुद्दा समोर ठेवत आणि अदनान यांच्या नागरिकत्वाचा विषय उचलून धरत या पुरस्काराचा विरोध केला जात आहे. आता तर त्यांच्या वडिलांच्या प्रकरणातही त्यांना ट्रोल केले जात आहे. अदनान यांचे वडील पाकिस्तानच्या युद्धात सहभागी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देऊ नये असे बोलले जात आहे. आतापर्यंत या विषयावर अदनानकडून काहीच प्रतिक्रिया आली नव्हती, मात्र नुकतीच त्यांनी मीडियाला आपली प्रतिक्रिया कळवली. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत..., या प्रकरणात वडिलांचे नाव घेतल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले..., माझे वडील एअरफोर्समध्ये हाेते. ते वॉर हीरो होते. १९६५ मध्ये झालेल्या लढाईत ते पाकिस्तानकडून भारताविरुद्ध लढले होते. ते आपल्या देशाचे काम करत होते. मला त्यांचा अभिमान आहे. मात्र पुरस्काराच्या प्रकरणात माझ्या वडिलांचे नाव घेणे चुकीचे आहे. मला पद्मश्री मिळण्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. मी माझे काम देशासाठी करतो आणि माझ्या वडिलांनी त्यांच्या देशासाठी काम केले. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. यांना विनाकरण एकत्र जोडले जात आहे. मी कोणत्याच पार्टीचे समर्थन करत नाही. कोणतेही सरकार जर चांगले काम करत असेल तर मी त्याचे कौतुक करतो. जर एखादी पार्टी चांगले काम करत नसेल तर त्यांच्यावर टीकादेखील करतो. मी एक कलाकार आहे, मला राजकारणाशी काही देणे-घेणे नाही. मी माझ्या गाण्यावर प्रेम करतो. अदनान पुढे म्हणाले..., मला गायनाच्या क्षेत्रात आज ३४ वर्षे झाली आहेत. यापैकी मी २० वर्षे भारतात घालवली आहेत. मी जेव्हा कधी विदेशात गेलो तेव्हा भारताचे नाव रोशन केले. एक भारतीय नागरिक म्हणून मी विदेशात जातो. माझे जे यश आहे ते भारताचे यश आहे. राहिला पद्मश्रीचा विषय तर मी कधी याचा विचारही केला नव्हता. मला एक दिवस फोन आला, त्या वेळी मला थोडीही कल्पना नव्हती की, फोन यासंदर्भात असेल. मी थोडा वेळ तर चकित झालो होतो. ते माझ्यासाठी शॉकिंग हेाते. दुसरीकडे सीएएवर बोलताना अदनान म्हणाला..., मी काही नेता नाही. ज्याप्रमाणे राग दरबारीशी राजकारणाचे काही नाते नसते, तसेच माझेदेखील या प्रश्नांशी काही देणे-घेणे नाही. लोकांना कळायला पाहिजे की, बाहेरून आलेल्या मायनॉरिटीजला सीएएअंतर्गत सुविधा देत असेल तर यात काहीच वाईट नाही. यामुळे नागरिकत्वाची प्रक्रिया लवकर पूर्ण होईल. कारण मला देशाचे नागरिकत्व मिळण्यासाठी १८ वर्षे लागली. माझी आई जम्मूची होती. ही गोष्ट कधीच नाकारली जाऊ शकत नाही. माझे संगीताचे गुरू भारताचे होते. मी त्यांच्याकडूनच शास्त्रीय संगीत शिकलो. माझ्या वडिलांचा जन्म भारतात झाला आहे आणि भारतातच त्यांचे निधन झाले. माझ्या वडिलांनादेखील संगीत आवडत होते. ते लताजींचे चाहते होते. त्यांनीच मला संगीताची प्रेरणा दिली. वैयक्तिकरीत्या त्यांचे भारताशी काही वैर नव्हते, त्यांना हा देश खूप आवडत होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.