पद्मश्री पुरस्कार / मेघना पेठे, शीतल साठे, मलिका अमर शेख यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर

रंगकर्मी, कवी डॉ. मंगेश बनसोड यांना दुसरा ‘बलुतं पुरस्कार’ 
 

दिव्य मराठी नेटवर्क

Sep 08,2019 07:41:00 AM IST

मुंबई - पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानतर्फे २०१९चा दया पवार स्मृती पुरस्कार सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार मेघना पेठे, ज्येष्ठ कवयित्री-लेखिका मलिका अमर शेख आणि नव्या पिढीच्या आघाडीच्या लोकशाहीर शीतल साठे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सोहळा शुक्रवार, २० सप्टेंबर २०१९ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. यंदाचा हा तेविसावा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी दहा हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्या वर्षी ‘बलुतं’च्या चाळिशीच्या निमित्ताने ग्रंथाली पुरस्कृत “बलुतं पुरस्कार’ सुरू करण्यात आला होता. या वर्षी तो रंगकर्मी व कवी डॉ. मंगेश बनसोड यांना ‘उष्टं’ या अनुवादित आत्मकथनासाठी जाहीर करण्यात आला आहे. दिवंगत ज्येष्ठ हिंदी लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांच्या ख्यातनाम ‘जूठन’ या आत्मकथनाचा मंगेश बनसोड यांनी मराठी अनुवाद केला आहे. या पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार असून ज्येष्ठ समीक्षक डॉ. हरिश्चंद्र थोरात आणि वरिष्ठ पत्रकार-कथाकार प्रतिमा जोशी प्रमुख पाहुणे असतील. सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ करतील, अशी माहिती दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी दिली.

X
COMMENT