आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मकथा : राहीबाई - आदिवासी भागातील बीजमाता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजय पोखरकर

'बीजमाता' म्हणून ओळख असलेल्या राहीबाई सोमा पोपेरे यांना यंदाचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी भागातील जाणिवा रुजवणारी कसदार माती, आपलं 'मूळ' टिकवून ठेवणारी मातृवृत्ती आणि निसर्गाशी मैत्र जपणाऱ्या संस्कृतीचाच त्यांच्या रूपाने गौरव झाला आहे.

नगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील कोंभाळणे येथील आदिवासी शेतकरी कुटुंबात राहीबाईंचा जन्म झाला. वडिलांची परिस्थिती गरिबीची. घरी सात भावंडे असल्याने त्यांनी राहीबाईंना शाळेत घातले नाही. आई-वडिलांबरोबर त्या शेतामध्ये मदत करू लागल्या. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न होऊन सासरी रवानगी झाली. तिथेही पती सोमा यांच्याबरोबर त्या शेतात राबू लागल्या. सुरुवातीला रासायनिक शेतीचा अनुभव घेतला. संकरित वाणांपासून उत्पादन जास्त येत असले, तरी उत्पादन खर्चही मोठा होतो. रासायनिक औषधे आणि कीटकनाशके मोठ्या प्रमाणात वापरल्याने आरोग्यावर विपरित परिणाम होतो, हे लक्षात आल्यानंतर राहीबाईंनी घरी खाण्यासाठी आपल्या परसबागेत गावरान भाजीपाला लावला. जुन्या वाणांचा संग्रह निर्माण करून शेतीतही बदल घडवून आणला. दरम्यान बायफ' या संस्थेशी त्यांचा बचत गटांच्या माध्यमातून संबंध आला.

महाराष्ट्र जनुक कोश प्रकल्प या भागात नुकताच सुरू झाला होता. राहीबाईंचे पारंपरिक वाणांचे ज्ञान आणि बियाणे संग्रहाची नोंद घेऊन २०१६ मध्ये घरातील एक छोट्या खोलीतच बियाणे बँक सुरू केली. या बीज बँकेमार्फत पारंपरिक वाणांचा प्रचार व प्रसार राहीबाई करू लागल्या. आज त्यांच्या बीज बँकेत ५४ पिकांचे ११६ विविध प्रकारचे वाण उपलब्ध आहेत. त्यात वाल आणि पावट्याच्या सुमारे २० वाणांचा संग्रह आहे. हे सर्व वाण प्रोटीनयुक्त व कमी पाण्यावर येऊ शकणारे आहेत. यातील काही वाण तर हवेतील ओलाव्यावर येऊ शकतात. भात, नागली, वरई अशा विविध ३० प्रकारच्या भाज्या, तेलवर्गीय पिके, तृण व गळीत धान्य राहीबाईंनी जतन केले आहे.

'बायफ'च्या मदतीने राहीबाईंनी या वाणांचा प्रचार- प्रसार करताना राज्य व देश पातळीवरील प्रदर्शनात सहभाग नोंदवला. याशिवाय, शाळा, महाविद्यालये, बचतगट, चर्चासत्रे, शिबिरे या माध्यमांतून देशी वाणांच्या जतन- संवर्धनाबाबत जागृती केली. आदिवासी भागात महिला बचत गटांच्या माध्यमातूनच स्थानिक वाणांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर केला. परसबागेसाठी लागवडीयोग्य गावरान बियाणे राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली. कळसूबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेची स्थापना करून आता त्यामार्फत स्थानिक वाणांचे संवर्धन व प्रसार कार्य सुरू आहे.

या कार्याची दखल घेऊन राहीबाईंना वसंतराव नाईक पुरस्कार, 'बायफ'चा राष्ट्रीय पातळीवरील आदर्श शेतकरी पुरस्कार, आदिवासी सेवक पुरस्कार, झी मीडियाचा अनन्य सन्मान, आदर्श शेतकरी असे अनेक पुरस्कार मिळाले. 'बीबीसी वर्ल्ड'ने जाहीर केलेल्या १०० प्रतिभावंत व प्रेरणादायी महिलांच्या यादीतही त्यांचा समावेश झाला. तत्कालीन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बीज बँकेसाठी अवघ्या ४५ दिवसांत कोंंभाळणे येथे इमारत आणि घर बांधून दिले. चित्रपट निर्माते अच्युतानंद द्विवेदी यांनी राहीबाईंच्या कार्यावर लघुपट तयार केला आहे. फ्रान्समधील कान्स महोत्सवात त्याला पारितोषिक मिळाले. केंद्र सरकारचा २०१८ चा 'नारी शक्ती' पुरस्कार राहीबाईंना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. 'बीजमाता' म्हणून ओळख असलेल्या राहीबाईंना आता 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे. आदिवासी भागातील जाणिवा रुजवणारी कसदार माती, आपलं 'मूळ' टिकवून ठेवणारी मातृवृत्ती आणि निसर्गाशी मैत्र जपणाऱ्या संस्कृतीचाच त्यांच्या रुपाने गौरव झाला आहे.

अभ्यासक्रमात राहीबाई

वाणिज्य शाखेतील प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात राहीबाईंच्या कार्याचा संदर्भ देण्यात आला आहे. 'मिस वर्ल्ड' किताब मिळवलेली अभिनेत्री युक्ता मुखी हिने राहीबाईंकडून आहाराविषयी सखोल माहिती घेतली. शिवाय, 'तुमच्याकडे येऊन मला सर्व शिकायचे आहे', अशी भावनाही व्यक्त केली.

लेखकाचा संपर्क : 9403545905 विजय पोखरकर
vijaypokharkar.1@gmail.com

बातम्या आणखी आहेत...