आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मकथा : सय्यदभाई : दगडावर पेरणी करणारा माणूस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. हरेश शेळके

मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना झाली तेव्हापासून सय्यदभाईंमधील ‘कार्यकर्ता’ मुस्लिम समाजातील परिवर्तनासाठी अहोरात्र झगडत आहे. ते नेहमी सांगतात, ‘दगडाचा कधी ना कधी मुरूम होईल, मुरमाची माती होईल. मग त्यातून नवे पीक जन्माला येईल...’ सय्यदभाईंनी दगडावर सुरू केलेली ही पेरणी पद्म पुरस्कारामुळे निश्चितच बहराला येईल.


‘दगडावरची पेरणी’ हे साहित्यिक राजन खान यांनी म्हटल्याप्रमाणे एका कार्यकर्त्याचे कार्यकथन आहे. सय्यदभाई यांनी आपल्या जीवनात लहानपणापासून प्रचंड मोठा संघर्ष केला आहे. त्यांच्या वाट्याला आलेला संघर्ष हा जसा व्यक्तिगत आहे, तसाच तो कौटुंबिक आणि सामाजिकही आहे. शाळेसाठी सय्यदभाईंना खूप मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागला. वयाच्या तेराव्या/चौदाव्या वर्षीच त्यांना नोकरीसाठी भटकावे लागले. याच टप्प्यावर त्यांनी पुण्यातील वाकडेवाडीजवळ असलेल्या भारत पेन्सिल या कारखान्यात नोकरीला सुरूवात केली. तिथे सय्यदभाईंना पडेल ते काम करावे लागले. या कारखान्यात त्यांच्याबरोबर महाशब्दे, लंगोटे, सय्यद हेही मित्र काम करीत असत. त्यांच्यात अनेक प्रश्नांवर चर्चा होत असे. त्यात महाशब्दे थोडे उजव्या विचारसरणीचे, लंगोटे समाजवादी विचारसरणीचे आणि सय्यदभाई मुस्लिम होते. त्यामुळे या सर्वांचे विचार, चर्चा यांतून आणि एकत्र राहण्यामुळे सय्यदभाईंच्या विचारांना दिशा मिळाली आणि त्यांना आपल्यातला कट्टर मुस्लिमवाद कसा चुकीचा आहे, हे जाणवू लागले. तेथेच त्यांच्या विचारांना मानवी, सामाजिक आणि धार्मिक समतेच्या मूल्यांची जोड मिळाली. एका अर्थाने सय्यदभाईंमधील कार्यकर्ता घडण्यास सुरूवात झाली.

‘भारत पेन्सिल’ कारखान्याचे संस्थापक तात्या मराठे हे सुद्धा सय्यदभाईंना एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, साने गुरुजी अशा अनेक समाजवादी नेत्यांच्या आठवणी सांगत. त्याचाही परिणाम सय्यदभाईंच्या विचारांवर झाला. राममनोहर लोहिया,भाई वैद्य, डॉ. बाबा आढाव, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी यांची भाषणे ऐकल्यामुळे धर्मापलीकडे जाऊन माणसाचा विचार कसा केला पाहिजे, याची शिकवण सय्यदभाईंना मिळाली. याचदरम्यान एका दुर्दैवी घटनेला त्यांना सामोरे जावे लागले.धाकटी बहीण खतिजा हिचा पती अब्दुल दुसरे लग्न करणार असल्याचे सय्यदभाईंना समजले. त्यामुळे त्यांचे घरातील वातावरण अस्थिर झाले होते. 

या घटनेचा सय्यदभाईंच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांनी ठरवले, की आपल्याला जसे जमेल तसे आपण एकतर्फी “तलाक’ विरुद्ध लढायचे. आता आपण माघार घ्यायची नाही. ते तलाकबद्दल प्रत्येकाला विचारू लागले. खतिजावरील अत्याचारांनी सय्यदभार्ईंची दृष्टी, विचारांची दिशा बदलली. त्यांच्यातील माणूस अधिकाधिक चिंतनशील होत गेला. समाजाकडे वेगवेगळ्या अंगाने पाहू लागला. यातूनच स्त्रियांच्या प्रश्नाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनही बदलला. या पार्श्वभूमीवर, मुस्लिम महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा, अशी त्यांची ठाम धारणा झाली. त्यामुळेच सय्यदभाई सांगतात, ‘खतिजा ही माझ्या बंडखोरीची प्रेरणा होती’.

सय्यदभाईंनी पुढे ‘तलाक’च्या प्रश्नाविषयी, मुस्लिम समाजातील समस्यांविषयी जनजागृती करण्याचा कार्यक्रम हाती घेतला. कधी भाषणे ऐकणे, कधी लोकांशी प्रत्यक्ष समाजात जाऊन चर्चा करणे, कधी कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समाज जागा करणे, असा सय्यदभाईंचा प्रवास सुरू झाला. स्वतःच्या बहिणीला मिळालेला तलाक, त्यातून मिळालेली प्रेरणा येथूनच एकतर्फी तलाकचा प्रश्न संपवलाच पाहिजे,असे त्यांच्या मनाने पक्के ठरवले. माझ्या बहिणीचं झालं गेलं, पण अशा शेकडो, हजारो महिला असतील. त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असं त्यांना वाटायचं. याच टप्प्यावर हमीद दलवाईंसारख्या पुरोगामी विचारवंताची मिळालेली साथ आणि स्वतःच्या स्पष्ट विचारांतून भूमिका घेऊन सय्यदभाईंनी काम करण्यास प्रारंभ केला.

‘तलाक’चा प्रश्न, इस्लामचे तत्त्वज्ञान, मुल्ला-मौलवी यांचे वर्चस्व, मुस्लिम समाजातील पुरुषी वृत्ती , तलाकपीडित महिलांच्या वेदना, बेरोजगारीचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांविषयी समजावून हमीद दलवाई, सय्यदभाई आणि सहकाऱ्यांनी संपूर्ण परिवर्तनासाठी २२ मार्च १९७० ला मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत सय्यदभाईंमधील ‘कार्यकर्ता’ अहोरात्र मुस्लिम समाजातील  परिवर्तनासाठी झगडत आहे. 

भारत सरकारने नुकताच ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन त्यांच्या या कठोर परिश्रमाचा सन्मान केला. दगडावरच्या पेरणीची आज नितांत गरज आहे. सय्यदभाई नेहमी सांगतात, दगडाचा कधी ना कधी मुरूम होईल, मुरमाची माती होईल. नंतर त्यातून नवे पीक जन्माला येईल. सय्यदभाईंनी दगडावर सुरू केलेली पेरणी पद्म पुरस्कारामुळे बहराला येईल. 


लेखकाचा संपर्क :  9767176
651

बातम्या आणखी आहेत...