आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पद्मशाली मूक मोर्चा : पक्ष आणि धर्मभेद विसरून रस्त्यावर उतरले सोलापूरकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- अहमदनगरमध्ये पद्मशाली समाजातल्या एका अकरा वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बुधवारी सकाळी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पक्ष, जात आणि धर्मभेद विसरून सर्व समाजघटकांतील हजारो तरुण, तरुणींनी यात सहभाग घेतला. दोषीस जलदगती न्यायालयाच्या आधारे तीस दिवसांत फाशी देण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. 


सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कन्ना चौक येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मोर्चा कन्ना चौक, साखर पेठ, गुरुवार पेठ, बाराईमाम चौक, विजापूर वेस, मार्कंडेय मंदिर, पंच कट्टा, जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरून काढण्यात आला. माेर्चामध्ये "महिला संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करावी', "नराधमास पाठीशी घालणाऱ्यांना सहआरोपी करावे', "प्रशासनाची दिरंगाई चालणार नाही', "जलदगती न्यायालयात खटला चालवावा', "अॅड. उज्ज्वल निकम यांना वकील म्हणून नेमावे' आदी मागण्यांचे फलक घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थिनी मोर्चात सहभागी होत्या. काहींनी काळे शर्ट परिधान केले होते तर काहींनी काळ्या टोप्या घातल्या होत्या. 


हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय ते पंच कट्टापर्यंत पसरला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर तेथे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष महेश कोठे, माजी आमदार नरसय्या आडम आणि भावना अमंनजी, दिव्या सरवदे या विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले. समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले. शेवटी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे सचिव सुरेश फलमारी यांनी आभार मानले. 

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महापौर शोभा बनशेट्टी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, नगरसेवक विनोद भोसले, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, संतोष पवार, दिलीप कोल्हे, जुबेर बागवान, बसपाचे आनंद चंदनशिवे, सत्यनारायण बोल्ली, दशरथ गोप, रामचंद्र जन्नू, पांडुरंग दिड्डी, मुरलीधर अरकाल, अशोक इंदापुरे, अॅड. श्रीनिवास क्यातम, नरेंद्र कटकम, महेश धारा, नगरसेवक नागेश वल्याळ, श्रीनिवास करली, देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका सुनीता रोटे, श्रीकांचना यन्नम, कुमूद अंकाराम, माजी नगरसेविका विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडक्याल, वृषाली चालुक्य, सुदीप चाकोते, विष्णू कारमपुरी, मतीन बागवान, पेंटप्पा गड्डम, राजू राठी, उमेश मामड्याल, नाना काळे, राजन जाधव, नंदू मुस्तारे आदींसह अनेकजण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

 

काय आहे प्रकरण ? 
नगरच्या तोफखाना परिसरातील एका चिमुरडीवर अत्याचार झाला. अफसर लतीफ सय्यद असे नराधमाचे नाव आहे. या घटनेची वाच्यता केल्यास कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. ३० ऑगस्टला ही घटना घडली. १५ सप्टेंबरला हे प्रकरण पोलिसात गेले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून तीस दिवसांच्या आत त्या नराधमास फाशी द्यावी, पीडित कुटुंबाला मुख्यमंत्र्यांनी त्वरित २५ लाख रुपयांची मदत द्यावी, पीडित मुलीचा उच्च शिक्षणाचा खर्च शासनाने उचलवा, पीडितेस उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा माेफत मिळावी, अशी मागणी या प्रसंगी अनेकांनी केली. 


मोर्चात सहभागी शाळा, महाविद्यालये 
संभाजी प्रशाला, बुर्ला महाविद्यालय, पुल्ली कन्या प्रशाला, श्रीराम हायस्कूल, कुचन हायस्कूल, राज मेमोरियल हायस्कूल, विडी घरकुल येथील डी.एड. महाविद्यालय, सिंगम प्रशाला, पायोनियर क्लासेस, केकडे महाविद्यालय आदी शाळांमधून सुमारे सात ते आठ हजार विद्यार्थी उपस्थित होते. 


यांचा होता पाठिंबा 
यंत्रमागधारक संघ, निलगार ज्ञाती संस्था, पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, निलगार समाज शिक्षण प्रसारक मंडळ, श्री मार्कंडेय जनजागृती संघ, श्री त्रिशक्ती सांस्कृतिक मंडळ, अखिल भारत पद्मशाली संघम, युवा भीम सेना, सकल मराठा समाजाचे माउली पवार, यशदा फाउंडेशनच्या फिरदोस पटेल, मौलाना आझाद विचार मंचचे शहराध्यक्ष शौकत पठाण, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फारुख शेख आदींचा या मोर्चास पाठिंबा होता. 


 

बातम्या आणखी आहेत...