आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅडवूमन : सॅनिटरी पॅड निर्मितीद्वारे स्वतःच्या पायावर उभी राहिली महिला, 6 महिलांना उपलब्ध करून दिला रोजगार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकुरके - सोलापूरच्या  मोहोळमधील स्वाती अजित ढवन यांनी केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (सी.एस.सी) च्या स्त्री स्वाभिमान उपक्रमांतर्गत सॅनिटरी नॅपकिन प्रकल्प उभा केला आहे. सॅनिटरी पॅड निर्मितीचा हा तालुक्यातील पहिलाच प्रकल्प आहे. 

 

या प्रकल्पासाठी पॅड निर्मिती, निर्जंतुकीकरण, कटिंग व इतर प्रोसेससाठी सुमारे 3 लाख रुपयांची उपकरणे खरेदी केली आहेत. पॅड निर्मितीसाठी शासनाच्या कर्मचाऱ्यांनी महिलांना प्रशिक्षण दिले. महिनाभरापूर्वी हा प्रकल्प सुरू करण्यात आला. यात स्वाती ढवण आणि इतर महिला कर्मचाऱ्यांनी आजवर 15 हजारांच्या सॅनिटरी पॅडची निर्मिती केली आहे.

 

पॅड निर्मितीसाठी 6 महिला काम करत असून त्यांना 150 रोज मजुरी देण्यात येते. महिला दिवसाला 1000 च्या आसपास सॅनिटरी पॅड तयार करतात. स्त्री स्वाभिमान या नावानेच हे पॅड विक्रीसाठी बाजार पेठेत दाखल होत आहेत. एका पॅडसाठी साधारणतः 4 रुपये खर्च येतो. या पॅडचे वैशिष्ट्य म्हणजे यात कापूस वापरला जात नाही, कोरफड पासून तयार केलेले जलशीट वापरले जाते. त्यामुळे वापरून झाल्यानंतर पॅडचे मातीत विघटन लवकर होते आणि   कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागतो. शाळा महाविद्यालयांत जाऊन याबाबत विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. 


27 जानेवारी 2018 रोजी केंद्र शासनाने स्त्री स्वाभिमान योजनेची घोषणा केली. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला, महाविद्यालयीन युवती, त्यांचे स्वास्थ्य, मासिक पाळी काळातील स्वच्छता वाढावी, सॅनिटरी पॅडचा वापर वाढावा तसेच ग्रामीण भागात या योजनेंतर्गत सॅनिटरी पॅड निर्मिती युनिट उभारून त्या माध्यमातून किमान 6, 7 महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि त्यांचे सशक्तीकरण व्हावे हा हेतू आहे. एकुरके येथील स्वाती ढवण यांनी उद्योग उभारून गावातील महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे. महिलांनी फक्त घरापुरते मर्यादीत न राहता सरकारच्या विविध योजनांना योजनांचा आधार घेत उद्योगात उतरले पाहिजे असे स्वाती ढवण म्हणाल्या. 

बातम्या आणखी आहेत...