आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘माझा मृतदेह कचराकुंडीत टाका’ अशी चिठ्ठी लिहून पेंटरने केली आत्महत्या; कारण गुलदस्त्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - मी स्वत:च्या मृत्यूस कारणीभूत आहे. माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाकावे, अशी चिठ्ठी लिहून पेंटरने हरिविठ्ठलनगरातील स्वत:च्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाने मृतदेह बघितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

राजेश हिंमत मकवाना (४०, भटवाड्याजवळ हरिविठ्ठलनगर) असे मृत पेंटरचे नाव आहे. ते पेंटिंगचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी व मुले धरणगाव येथे माहेरी गेलेले होते. घरात कुणी नसताना पत्र्याच्या छताच्या पाइपला साडीने गळफास घेऊन राजेश यांनी आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी घराच्या दरवाजाच्या कड्या आतून लावलेल्या होत्या. त्यांचा मोठा मुलगा दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरी आला. त्याने समोरचे दार ठोठावले; परंतु दरवाजाला आतून कडी लावलेली होती. त्यामुळे त्याने घराच्या मागच्या बाजूचा दरवाजा लोटून आत प्रवेश केला. त्यावेळी त्याला वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत रामानंदनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणला. विवेक बापू मोरे यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृत मकवाना यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, ३ भाऊ असा परिवार आहे. 

आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
राजेश यांनी आत्महत्या का केली? याचा पोलिस शाेध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राजेश यांचे पत्नीसाेबत जमत नव्हते ? त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली का याचा शोध आता पोलिस घेत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 

‘जय भीम’ करून घेतला जगाचा निरोप...
मकवाना यांच्याकडे रामानंदनगर पोलिसांना चिठ्ठी आढळून आली आहे. यात तिची सुरुवात नमो बुद्धायने करण्यात आली. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. मी स्वत: मृत्यूस कारणीभूत आहे. माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाकावा, हीच नम्र विनंती. सर्वांना सद्बुद्धी प्राप्त होवो, ही बुद्धचरणी प्रार्थना. जय भीम, राजेश मकवाना, असा मजकूर लिहिण्यात आला आहे.