आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठणचा विकास : एक दिवास्वप्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत एकनाथ व संत ज्ञानेश्वर महाराज यांची जन्म व कर्मभूमी, निसर्गरम्य संत ज्ञानेश्वर उद्यान आणि मराठवाड्याच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारे नाथसागर धरण, जगप्रसिद्ध महावस्त्र पैठणी असा वारसा लाभलेल्या या नगरीत भाविक व पर्यटक दररोज मोठ्या संख्येने येतात. मात्र या शहराचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. अनेक विकास योजना लालफितीत असल्याचे दिसते. महाराष्ट्र ही संतांची भूमी. पंढरपूर, आळंदी, शिर्डी, शेगाव, देवगड, शनी शिंगनापूर अशा अनेक तीर्थक्षेत्रांचा झपाट्याने विकास झाला आहे. मात्र तीर्थक्षेत्र पैठण विकासाच्या गंगेपासून दूरच राहिले आहे. आज येथे येणाºया भाविक व पर्यटकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकदा आलेला पर्यटक परत पैठणला येणे नको, अशी निराशाजनक प्रतिक्रया देऊन या नगरीविषयी निराश होतो. हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा, घाणीचे साम्राज्य, दूषित गोदावरी नदी, सांडपाण्याची समस्या, दशक्रियासाठी नसलेले स्वतंत्र ठिकाण, भक्त निवास, रखडलेली संतपीठ योजना, भकास एमआयडीसी अशा विविध समस्यांनी पैठण हे तीर्थक्षेत्र त्रस्त झालेले आहे. या नगरीचा वैभवसंपन्न ऐतिहासिक वारसा पाहून येथील विकासासाठी शासनाकडून लाखो रुपयांच्या योजनांची घोषणा होते. मात्र ती प्रत्यक्षात कृतीत उतरत नाही. आगामी अर्थसंकल्पात पैठण-आपेगाव विकास प्राधिकरणासाठी भरीव निधी मिळावा यासाठी लोकप्रतिनिधींनी आतापासूनच मागणी करण्याची गरज आहे. नाही तर पैठणकरांच्या पदरी नेहमीसारखी आश्वासनेच पडतील. परिणामी भाविक, पर्यटकांची नाराजी वाढत जाईल.