दहशतवादी / काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी पाकमध्ये 20 छावण्या 50 कडवे अतिरेकी सज्ज

कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात

वृत्तसंस्था

Oct 09,2019 09:33:00 AM IST

नवी दिल्ली - हिवाळ्यात बर्फवृष्टी सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांना मोठ्या प्रमाणात घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानने आपल्या हद्दीत २० शिबिरे आणि २० लाँच पॅड सुरू केले आहेत. या शिबिरामध्ये सुमारे ५० कडवे अतिरेकी सज्ज असल्याचे वृत्त आहे.


बालाकोट भागात असलेले दहशतवादी तळ भारताने केलेल्या हवाई हल्ल्यात उद््ध्वस्त करण्यात आले होते. यानंतरच्या काळात पाकिस्तानच्या या भागात असलेले बहुतांश दहशतवादी तळ बंद होते. गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु अद्याप पाकला यात यश आलेले नाही. त्यामुळे जास्तीत जास्त शस्त्रसज्ज अतिरेकी घुसवण्याचा पाकचा प्रयत्न आहे.


पुलवामात १ अतिरेकी ठार : पुलवामा जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दलाने एका चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला ठार केले. या भागात अतिरेकी दडून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी सकाळी अवंतीपोरा हद्दीत शोधमोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान उफेद फारुख लेन मारला गेला.

X
COMMENT