Pakistan / पीएम नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द मोकळी करणार पाकिस्तान, पाकमार्गे किर्गिस्तानला जाणार पंतप्रधान

यापूर्वी सुषमा स्वराज यांच्यासाठीही उठवले होते हवाई हद्दीचे निर्बंध

दिव्य मराठी

Jun 11,2019 12:20:00 PM IST

लाहोर / नवी दिल्ली - शांघाय समिटमध्ये सामिल होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र आता पाकिस्तानमार्गे किर्गिस्तानला जाणार आहेत. पाकिस्तान सरकारने सोमवारी भारताचे अपील मंजूर केले. तसेच पंतप्रधानांचे विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाण्यास मंजुरी दिली. पीएम मोदी 13-14 जून रोजी एससीओ समिटमध्ये सहभागी होणार आहेत. या संमेलनात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान देखील उपस्थित राहणार आहेत.


भारताने 26 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या बाळाकोट येथील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दीतून जाणाऱ्या सर्वच भारतीय विमानांवर बंदी लावली. भारतातून परदेशात जाणारे 11 मार्ग पाकिस्तानमधून निघतात. या बंदीमुळे भारतीय विमान कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अशात पंतप्रधान मोदींच्या विमानासाठी पाकिस्तानने हवाई हद्द मोकळी करावी असे अपील करण्यात आले होते. त्यालाच पाकिस्तानने हिरवा कंदिल दाखवला आहे.


सुषमा स्वराज यांच्यासाठीही उठवली होती बंदी
केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे, तर यापूर्वी माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासाठीही पाकिस्तानने नरमाईची भूमिका घेतली होती. 21 मे रोजी त्यांचे विमान पाकिस्तानमार्गे बिश्केकला रवाना झाले होते. 31 मे रोजी पाकिस्तानने आपल्या हवाई हद्दींमध्ये भारतावरील बंदी काही काळ शिथील केली होती. परंतु, भारताला लागून असलेल्या हवाई हद्दीवरील निर्बंधांना 14 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.

X