Home | International | Other Country | Pakistan assures US to deal firmly with terrorist

अतिरेक्यांचा खात्मा करू,पाक भूमीचाही वापर होणार नाही, पाकिस्तानचे अमेरिकेस वचन

वृत्तसंस्था | Update - Mar 13, 2019, 01:10 PM IST

अतिरेक्यांना पाक भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करू दिला जाणार नाही, असे वचन दिले आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय

 • Pakistan assures US to deal firmly with terrorist

  वॉशिंग्टन - पाकिस्तानने अमेरिकेला दहशतवाद नष्ट करण्यासाठी ठाेस कारवाई केली जाईल. अतिरेक्यांना पाक भूमीचा दहशतवादी कारवायांसाठी वापर करू दिला जाणार नाही, असे वचन दिले आहे, अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी दिली आहे.


  पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोमवारी दूरध्वनीवरून हे आश्वासन दिले. जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेच्या विरोधात ठोस कारवाई केली जाईल. पाक भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करू दिला जाणार नाही, असे कुरेशी यांनी म्हटले आहे. दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी पाकिस्तान कटिबद्ध असून भारतासोबतचा तणाव कमी करण्याचाही आमचा प्रयत्न आहे, असे कुरेशी यांनी मान्य केले. त्याचबरोबर पाक सरकार त्या दिशेने कार्यरत अाहे. लवकरच पाकिस्तानचे उच्चायुक्त देखील दिल्लीत कार्यरत होतील, असे कुरेशांनी स्पष्ट केल्याचे बोल्टन यांनी ट्विट करून सांगितले.


  १४ फेब्रुवारी रोजी पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला हाेता. त्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारताने सीमेपलीकडे थेट हवाई कारवाई केली होती. त्यात जैशच्या अड्ड्यांना लक्ष्य करण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकने मिग-२१ ने हल्ल्याचा प्रयत्न केला होता. मात्र भारताने त्यांना परतवून लावले. यात एक वैमानिक पाकिस्तानने ताब्यात घेतला होता. त्यास १ मार्च रोजी मायदेशी रवाना करण्यात आले होते.


  पॉम्पिआे-गोखले चर्चेमुळे शेजाऱ्यांवर दबाव
  परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिआे व परराष्ट्र सचिव गोखले यांच्यात अमेरिकेत नुकत्याच झालेल्या चर्चेमुळे पाकिस्तानवर दबाव वाढला होता. गोखले यांनी पुलवामा हल्ला प्रकरणात अमेरिकेशी चर्चा केली. त्याचबरोबर या प्रकरणी भारताला खंबीर पाठिंबा दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. सीमेपलीकडील दहशतवादाच्या विरोधात भारताने मोहीम सुरू केली आहे. त्याला अमेरिकेने पाठिंबा दिला आहे. भारत-अमेरिका दहशतवादाच्या विरोधातील लढाईत परस्परांच्या संपर्कात आहेत.

Trending