आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिस्पेर ग्लेशिअर (पाकिस्तान) : हवामान बदलामुळे वेगाने वाढणाऱ्या तापमानाचा सर्वाधिक धोका पाकिस्तानला संभवत आहे. हिंदुकुश हिमालयातील सर्वच हिमशिखरे वेगाने वितळत असल्याने येथील हसानाबादचे रहिवासी दररोज सावटाखाली जगत आहे. शिस्पेर हिमनदीतून वितळत येणाऱ्या काळ्या बर्फाचा लाेंढा दररोज ४ मीटरने जवळ येत चालला आहे. हवामान बदलांसाठी केले जाणारे उपाय अयशस्वी ठरले तर सद्य:स्थितीत होणाऱ्या कार्बन उत्सर्जनानुसार सन २१०० पर्यंत हिमालयातील दोन तृतीयांश हिमनद्या वितळून जातील. यामुळे नद्यांतील पाण्याचा प्रवाह वेगाने कमी होईल आणि हिमालयाच्या परिसरातील भागांत पाण्याची प्रचंड टंचाई उद््भवेल. म्हणजेच हिंदुकुश हिमालयातील सर्वच शिखरे बर्फविरहित हाेतील.
हसानाबादचा रहिवासी बाशीर अली म्हणाला, 'ग्लेशिअर वितळत असल्याने शेकडो टन बर्फ व डोंगरांचा ढिगारा लोकांना गाव सोडून जाण्यास भाग पाडत आहे. लोक बेघर होत आहेत आणि आमच्या परिसरातील डोंगर व चिखलयुक्त पाणी येत आहे. आमच्याकडे पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही.' ध्रुवीय क्षेत्र वगळता सर्वाधिक हिमनद्या असलेला पाकिस्तान एकमेव देश आहे. काराकोरम, हिमालय व हिंदुकुश डोंगररांगांत तब्बल ७,२०० हिमनद्या आहेत. त्यांच्यातूनच सिंधू आणि तिच्या उपनद्यांना पाणी मिळते. ते पाकिस्तानसाठी जीवनरेषेसमान आहे.
पाकच्या हवामान खात्याचे प्रमुख गुलाम रसूल म्हणतात की, भविष्यात अशा प्रकारच्या आपत्तींसाठी सज्ज राहावे लागेल. त्या थांबणार नाहीत. जंगलतोड व हवामान बदलांमुळेच या भागाचे तापमान वाढत आहे. परिणामी हिमनद्या वितळत आहेत. आता आमच्याकडे पाणी वाचवण्यासाठी कोणताही उपाय राहिलेला नाही. आमच्या धरणांत ३३ दिवसांचे पाणी साचवले जाते, ते आता १०० दिवसांपर्यंत करावे लागेल. यासाठी धरणनिर्मिती गरजेची आहे. या हिमनद्यांचे ६० % पाणी वाहून समुद्रात सामावते.
एव्हरेस्ट, हिमालय क्षेत्रात हिमनद्यांऐवजी झाडे अन् गवत
माउंट एव्हरेस्ट व हिमालय क्षेत्रातील हिमनद्या वेगाने वितळल्यामुळे येथील झाडे व गवताची संख्या वाढत आहे. ब्रिटनच्या एक्सटर विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी १९९३ ते २०१८ दरम्यान एव्हरेस्टजवळ नासाने उपलब्ध करून दिलेल्या उपग्रह चित्रांचे अध्ययन केले. गवत व झाडांची मालिका १५ पटींनी वाढल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.