आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशाह जमाल
इस्लामाबाद : डळमळीत अर्थव्यवस्थेशी झगडणाऱ्या पाकिस्तान सरकारकडे आता दैनंदिन खर्चासाठी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. या गरजा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी कराचीचे जिना आंतरराष्ट्रीय विमानतळ गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बदल्यात सरकार तीन बँकांकडून ४५२ कोटी डॉलरचे कर्ज घेणार. पाकिस्तानी चलनात ही रक्कम ७० हजार कोटी रुपये होते.
जिना विमानतळ पाकिस्तानचे सर्वात मोठे आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे विमानतळ आहे. देशातील सर्वात वर्दळीच्या या विमानतळावर २०१७-१८ मध्ये ६६ लाख ९७ हजार ७३ प्रवाशांची ये-जा झाली. विमानतळाची ११५० हेक्टर जमीन मीजान बँक, बँक ऑफ अलफलाह आणि दुबई इस्लामिक बँकेकडे गहाण ठेवण्यात येईल. पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. इम्रान खान यांचे सल्लागार फिरदौस आशिक अवान म्हणाले, मला याबाबत माहिती नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर काही सांगता येईल. मात्र, सूत्रांनी सांगितले की, ज्या कॅबिनेट बैठकीत इम्रान यांनी विमानतळ गहाण ठेवण्याबाबत चर्चा केली, त्या बैठकीला फिरदौस उपस्थित होते. संपत्ती गहाण ठेवून कर्ज घेण्याची ही पाकिस्तानी सरकारची पहिली वेळ नाही. यापूर्वीही वर्ल्ड बँक, आयएमएफ आणि इतर बाहेरील संस्थांकडून कर्जासाठी सरकारी रस्ते आणि पीटीव्ही आणि रेडिओ पाकिस्तानच्या इमारती गहाण ठेवल्या होत्या.
माजी गृहमंत्री रहमान मलिक सांगतात की, विमानतळ गहाण ठेवण्याचा निर्णय इम्रान यांचे अपयश दर्शवतो. नेत्याकडे दूरदृष्टी नसल्यामुळे हे झाले आहे. महागाई कमी करणे आणि अर्थव्यवस्था रुळावर आणणे हे इम्रान यांच्यासमोरील मोठे आव्हान आहे. इस्लामाबादच्या रावल भागातील एका सरकारी शाळेतील शिक्षक मोहंमद आसिफ सांगतात की, साखरेपासून ते पीठ आणि विजेपासून गॅस, अशा सर्व वस्तूंचे भाव वाढत आहेत. भाजीपाल्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. इम्रान सरकारने आम्हाला निराश केले.
 
दीड वर्षात वाढले ११४९ कोटी डॉलरचे कर्ज
- दीड वर्षात पाकवर ११४९ कोटी डॉलर एवढे विदेशी कर्ज वाढले आहे. मे २०१८ मध्ये ९५४० कोटी डॉलर होते. आता ११ हजार कोटी डॉलरवर पोहोचले आहे.
- आयएमएफच्या अहवालानुसार, चार वर्षांत पाकवर विदेशी कर्ज १३ हजार कोटी डॉलर होईल. म्हणजेच इम्रान यांच्या सत्ताकाळात ३६.३% कर्ज वाढेल.
- पाकच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार सर्व घटकांत घसरण आहे. ५०% घसरणीनंतर जीडीपी ६.२ % वरून ३.३ % वर आले. सुधारणेचे संकेत दिसत नाहीत.
- डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य यंदा २०% घटले आहे. नोव्हेंबरमध्ये अन्न-धान्य महागाईचा दर १६.५३ % राहिला. ऑक्टोबरमध्ये तो १३.१०% होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.