भारतात काँग्रेस नव्हे, भाजपची सत्ता आल्यास जल्लोष करणार पाकिस्तान! इम्रान खान यांचा खुलासा

दिव्य मराठी

Apr 10,2019 11:56:00 AM IST

इस्लामाबाद - विधानसभा असो की लोकसभा निवडणूक... भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रचारात पाकिस्तानचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. विविध प्रचार सभांमध्ये पीएम मोदींसह अनेक भाजप नेत्यांनी दावा केला की निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाल्यास पाकिस्तानात फटाके फुटतील. काँग्रेसच्या विजयाने पाकिस्तान खुश होईल असे भाजपच्या वतीने सांगितले जाते. परंतु, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्याने खरी परिस्थिती याहून उलट असल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुद्धा भारतात काँग्रेस नको आहे. लोकसभा निवडणुकीत पुन्हा मोदी सरकार यावे अशी इच्छा इम्रान खान यांनी व्यक्त केली आहे.


हे आहे कारण...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नुकताच परदेशी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारतात लोकसभा निवडणुकीवर बोलताना इम्रान खान यांनी मोदींचे समर्थन केले. पुन्हा मोदींची सत्ता आल्यास काश्मीरचा मुद्दा सोडवला जाऊ शकतो. काँग्रेस किंवा विरोधी पक्षांची सत्ता आल्यास ते काश्मीरच्या मुद्द्याला हात घालणार नाहीत. काँग्रेसचे नेते उजव्या विचारसरणीच्या भाजपला घाबरून काश्मीरवर चर्चेतून तोडगा काढण्यासाठी तयारच होणार नाहीत असे इम्रान यांना वाटते. याच दरम्यान त्यांनी भारताच्या दहशतवादविरोधी कारवायांचे समर्थन केले आहे. इम्रान म्हणाले, काश्मीरचा मुद्दा हा चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो. लष्करी मार्गातून किंवा सशस्त्र उठावातून यावर समाधान काढता येणार नाही. अशात पाकिस्तानचे दहशतवादी काश्मीरात जात असतील तर भारतीय लष्कर त्यांच्यावर कारवाई करणारच आहे.


मोदींच्या प्रचारावर केली टीका
खान यांनी मोदी पुन्हा सत्तेवर येण्याची इच्छा व्यक्त केली तरीही त्यांची धोरणे आणि निवडणुकीतील आश्वासने भयभीत करणारी असल्याचे म्हटले आहे. मोदींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये काश्मीरच नव्हे, तर देशभरातील मुस्लिमांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि मोदींच्या प्रचार सभेत सुद्धा याची झलक दिसून येते. त्यांनी पुन्हा भाजपची सत्ता आल्यास काश्मीरींना विशेषाधिकार देणारी कलम 370 रद्द करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. हा मोठ्या चिंतेचा विषय आहे. परंतु, भाजपकडून हा केवळ एक निवडणुकीचा स्टंट देखील ठरू शकतो यात वाद नाही असे इम्रान खान यांनी सांगितले.

X