आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकने रचला पराभवांचा विश्वविक्रम; ऑस्ट्रेलियात सलग १४ वा पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅडिलेड - ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दुसऱ्या कसाेेटीत डाव व ४८ धावांनी हरवले. या विजयासह संघाने दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. पाकचा हा ऑस्ट्रेलियातील सलग १४ वा पराभव ठरला. पाक एकाच देशात सर्वाधिक सामने गमावणारा पहिला देश बनला आहे. यापूर्वी बांगलादेशने आपल्याच देशात २००१ ते २००४ मध्ये सलग १३ सामने गमावले होते. पाक संघ गेल्या २० वर्षांपासून ऑस्ट्रेलियात जिंकला नाही. १९९९ पासून खेळवण्यात आलेल्या सर्व पाच मालिकांत ऑस्ट्रेलियाने क्लीन स्वीप केले. दिवस-रात्र कसोटीच्या चौथ्या दिवशी पाक दुसऱ्या डावात २३९ धावांवर ढेपाळला. शान मसूदने ६८ आणि असद शफिकने ५७ धावा काढल्या. पाकिस्तानने पहिल्या डावात ३०२ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने पहिला डाव ३ बाद ५८९ धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच एखाद्या कसोटीत केवळ ३ गडी गमावले आणि सामना जिंकला. वेगवान गोलंदाज स्टार्कने सामन्यात ७ आणि ऑफ स्पिनर नाथन लॉयनने ५ विकेट घेतल्या. स्टार्कने पहिल्या डावात ५ आणि लॉयनने दुसऱ्या डावात ५ बळी घेतले. डेव्हिड वॉर्नर सामनावीर ठरला. वॉर्नरने मालिकेत ४८९ धावा काढल्या व मालिकावीर ठरला.
 

७ वर्षांनी देशात सलग २ सामने डावाने जिंकले 
ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी डाव व ५ धावांनी सामना जिंकली होती. त्यासह मालिकेतील दोन्ही सामने डावाने आपल्या नावे केले. आॅस्ट्रेलियाने ७ वर्षांनी घरच्या मैदानावर सलग दोन सामने डावाने जिंकले. यापूर्वी जानेवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला सलग २ सामन्यांत डावाने हरवले होते. संपूर्ण मालिकेत ऑस्ट्रेलियाने १३ गडी गमावले.ऑस्ट्रेलियात १३ मालिका खेळल्या, १० पराभूत, ३ ड्रॉ 

पाकिस्तानने ऑस्ट्रेलियात आतापर्यंत १३ मालिकांत एकूण ३७ सामने खेळले. १० मालिकांत त्यांचा पराभव झाला आणि ३ बरोबरीत राहिल्या. पाक टीम आतापर्यंत तेथे एकही मालिका जिंकू शकला नाही. ऑस्ट्रेलियाने २६ सामने आणि पाकिस्तानने ४ सामने जिंकले. ७ सामने बरोबरीत सुटले. पाकने येथे सलग नववी मालिका गमावली.
 

ऑस्ट्रेलिया १०० टक्के विजयी 

टीम ऑस्ट्रेलियाने सलग सहा दिवस-रात्र कसोटी सामने जिंकले आहेत. त्याचा विजयाचा रेकॉर्ड १०० टक्के आहे. इतर कोणतीही टीम अशी कामगिरी करू शकली नाही. बांगलादेश, वेस्ट इंडीज व झिम्बाब्वे अातापर्यंत एकही दिवस-रात्र कसोटी जिंकू शकला नाही.

कांगारु १२० गुण, दुसऱ्या स्थानी 

ऑस्ट्रेलियाला २ सामन्यांची मालिका जिंकल्यानंतर त्यांना १२० गुण मिळाले. त्यांनी ७ पैकी ४ सामने जिंकले व २ सामने गमावले. ऑस्ट्रेलिया १७६ गुणांसह जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये दुसऱ्या स्थानावर व. टीम इंडिया ३६० गुणांसह नंबर वन आणि न्यूझीलंड (६०) तिसऱ्या स्थानी आहे.