International Special / पाक बिथरला : पाकने भारतीय उच्चायुक्तांना परत पाठवले, व्यापारी संबंधही तोडले; भारताविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात दाद मागण्याची तयारी

भारतावर परिणाम नाही; भारतीय व्यापारात पाकचा वाटा केवळ ०.३%

दिव्य मराठी वेब

Aug 08,2019 07:05:12 AM IST

इस्लामाबाद/ नवी दिल्ली/ श्रीनगर - जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयामुळे बिथरलेल्या पाकने भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना परत पाठवले. पंतप्रधान इम्रानखान यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी म्हणाले, “पाकचे उच्चायुक्त आता दिल्लीत राहणार नाहीत. त्यांच्या उच्चायुक्तांनाही परत पाठवले आहे.’ रात्री उशिरा पाकने हा निर्णय भारताला कळवला. याशिवाय भारताशी व्यापार बंद करण्याचा मोठा निर्णय पाकने घेतला. पाकचे लष्करप्रमुख, आयएसआय प्रमुख आणि वरिष्ठ मंत्र्यांच्या बैठकीत काश्मीर मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत मांडला जाईल, असे सांगण्यात आले. पाकिस्तान आपला १४ ऑगस्ट रोजीचा स्वातंत्र्यदिन काश्मिरींसोबत साजरा करेल. तसेच भारताचा स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट काळा दिवस पाळण्याचेही बैठकीत ठरले. भारतासाठी तीन हवाई मार्गही बंद करण्यात आले असल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. दरम्यान, पाकच्या या निर्णयावर रात्री उशिरापर्यंत भारताने कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

डोभाल काश्मीरमध्ये; राज्यपालांशी चर्चा, शोपियात रस्त्यावर लोकांसोबत भाेजन केले

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी प्रदेशातील सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. त्यानंतर डोभाल संवेदनशील अशा शोपियामध्ये दाखल झाले. तेथे स्थानिक लोकांशी चर्चा केली. येथील एका चौकात त्यांनी लोकांसोबत भाेजनही केले.

काश्मीर पुनर्रचना विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
जम्मू-काश्मीर राज्य पुनर्रचना विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजूर झाल्यानंतर ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेले होते. या विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे आता जम्मू-काश्मीरला दोन भागात विभागण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. अजून यात खूप काही गोष्टी ठरायच्या आहेत. यासाठी लवकरच एक समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने विभाजन होऊ शकेल.

काश्मीर : नेत्यांसह ५०० हून अधिक लोक ताब्यात
पूंछ जिल्ह्यात बाफ्लाइज भागात काही लोकांनी दगडफेक केली होती. या पार्श्वभूमीवर खोऱ्यात शांततेचा भंग होऊ नये म्हणून सुरक्षा दलांनी ५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. याशिवाय काश्मीर खोऱ्यात दूरध्वनी व इंटरनेट सेवा चौथ्या दिवशीही बंद होती. राज्यपालांनी केंद्राला अहवाल देताना राज्यात सुरक्षा व्यवस्था समाधानकारक असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान मोदींचे आज राष्ट्राला उद्देशून भाषण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी राष्ट्राला उद्देशून भाषण करण्याची शक्यता आहे. राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयासोबतच जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांत विभाजन करण्याच्या निर्णयावर ते सविस्तर बोलतील.

१८ हजार कोटींचा व्यापार

> भारत-पाकदरम्यान एकूण सुमारे १८ हजार कोटींचा व्यापार होतो. यात भारत ८० टक्के निर्यात करतो आणि २० टक्के आयात.
> यापूर्वी २००१ मध्ये भारताने आपल्या उच्चायुक्तांना परत बोलावले होते. २००२ मध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तांना बडतर्फ केले होते.
> भारतातून पाकिस्तानला होणाऱ्या एकूण निर्यातीत ३७% वाटा रासायनिक उत्पादने व ३३% वाटा वस्त्रोद्योगासंबंधी वस्तूंचा आहे.

X
COMMENT