आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफांच्या वापसीसाठी पाक करणार ब्रिटिश सरकारला विनंती

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वापसीसाठी ब्रिटिश सरकारला विनंती करणार असल्याची घोषणा पाकिस्तानने केली आहे. पाकिस्तानने गेल्या आठवड्यातच शरीफ यांना फरार घोषित केले होते. ते सध्या लंडनमधील एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंतप्रधान इम्रान खान यांच्या विशेष सहायिका फिरदोस आशिन अवान यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, शरीफ यांच्या वापसीबाबत ब्रिटन सरकारला पत्र लिहिण्याविषयी सरकारचे एकमत झाले आहे. शरीफ यांना वैद्यकीय कारणांसाठी जामीन मिळाला होता. मात्र जामिनाच्या अटींचे पालन केले नाही. तसेच त्यांच्यावर कुठलीही शस्त्रक्रिया झालेली नसून ते रुग्णालयातही दाखल नाहीत, असे अवान म्हणाल्या.  दुसरीकडे शरीफ यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, शरीफ हे किडनीच्या विकाराने आजारी आहेत. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र अवान यांनी हा दावा फेटाळला असून शरीफ यांना पाकमध्ये आणणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पाकिस्तान सरकार या आठवड्यातच शरीफ यांच्या वापसी‌विषयी ब्रिटन सरकारला पत्र लिहिणार आहे. शरीफ हे गेल्या वर्षी १९ नोव्हेंबरला उपचारासाठी लंडनला रवाना झाले होते. मात्र ते रुग्णालयात दाखल झाले नाहीत. आजाराचे कारण सांगून विदेशात पळ काढण्याचा हा त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा डाव होता, असा आरोप अवान यांनी केला. तसेच शरीफ आणि त्यांचे भाऊ शाहबाज केवळ व्यावसायिक कारणासाठी लंडनला गेल्याचा दावा त्यांनी केला. गेल्या आठवड्यात पंजाब सरकारने शरीफ यांच्या जामिनाची मुदत वाढवण्यास नकार दिला होता. मुदतवाढ देण्यास आवश्यक असलेले कोणतेही वैद्यकीय आधार आढळले नसल्याचे पंजाब सरकारने म्हटले होते. दरम्यान, लाहोर उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी शरीफ यांना चार आठवड्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर केला होता. तसेच अल अझिझा मिलमधील भ्रष्टाचारप्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शरीफ यांना जामीन मंजूर केला होता. दरम्यान, शरीफ यांनी पाकिस्तानात परतण्याचा निर्णय घेतल्यास, इम्रान खान यांचे सरकार त्यांना न येण्याची विनंती करेल, असा गंभीर आरोप  पीएमएल-एनचे महासचिव अहसान इक्बाल यांनी केला आहे. ते म्हणाले की, तीन वेळा पंतप्रधानपद भूषवलेले शरीफ लवकरच सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देणार आहेत. ...तर आम्हीही अमेरिकेला पत्र लिहू

पीएमएल-एनच्या माहिती सचिव अजमा बोखारी यांनी सांगितले, जर पाकिस्तानने शरीफ यांच्या वापसीसाठी ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले तर पीएएमएल-एनदेखील अमेरिकी सरकारला पत्र लिहून पंतप्रधान इम्रान खान यांच्या अनैतिक संंबंधांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करेल. तसेच शरीफ यांची प्रकृती गंभीर असून याविषयी पंतप्रधान इम्रान खान यांनी राजकारण करू नये, असेही बोखारी म्हणाल्या.