आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान इतर देशांचे युद्ध लढणार नाही : नूतन पंतप्रधान इम्रान खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भविष्यात पाकिस्तान इतर देशांचे युद्ध अजिबात लढणार नाही, असे पाकिस्तानचे नूतन पंतप्रधान इम्रान खान यांनी स्पष्ट केले. आपल्या सरकारचे परराष्ट्र धोरण देशाच्या सर्वोच्च हिताच्या बाजूने राहील, असे त्यांनी सांगितले. 


संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात इम्रान शुक्रवारी बोलत होते. त्यांच्या वक्तव्यावरून पाकिस्तान आपल्या भूमीवरील दहशतवाद्यांच्या विरोधातील कारवाईत मागे हटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सैन्य व सरकार यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. राष्ट्रहितासाठी सैन्य व सरकार एकाच मार्गाने वाटचाल करत राहील. लष्करी संस्थेत सर्वकाही गुणवत्तेच्या आधारे केले जाते, असा दावा इम्रान यांनी केला आहे. इम्रान यांची भूमिका जाहीर झाल्याच्या आदल्या दिवशी टू प्लस टू चर्चेत भारत व अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करू नये, असा इशारा दिला होता. 


बाजवांनी आळवला काश्मीर राग, 'युद्धामुळे खूप झळ सोसली' 
पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा म्हणाले, पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधातील लढाईत फार मोठी किंमत मोजावी लागली आहे. पाकिस्तानला १९६५ व १९७१ दरम्यानच्या युद्धातून खूप काही शिकायला मिळाले. पाकिस्तानने स्वसंरक्षणासाठी आण्विक शस्त्रांना विकसित केले आहे. मात्र पाकला दहशतवादाच्या विरोधात मोठी किंमत मोजावी लागली. भारताच्या ताब्यातील काश्मीरच्या लोकांना सलाम करताे. ते ठामपणे उभे आहेत. पूर्ण बहादुरीने लढत आहेत. 


सिद्धूंचा दावा : करतारपूरसाहिब कॉरिडॉर सुरू करण्याची तयारी 
चंदिगड : पाकिस्तानने गुरू नानकजी यांच्या ५५० व्या प्रकाश पर्वानिमित्त करतारपूर साहिब कॉरिडोर सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असा दावा काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी शुक्रवारी केला. त्यांनी इम्रान यांची स्तुती केली. बाजवा यांच्या वक्तव्यावर सिद्धू यांनी काहीही वक्तव्य केले नाही. पाकिस्तान दौऱ्यादरम्यान सिद्धू यांनी बाजवा यांची गळाभेट घेतल्यामुळे ते वादात सापडले होते. पाकिस्तानने दोन पावले टाकली आहेत. भारत सरकारनेही एक पाऊल टाकावे. 


सीमेपलीकडील दहशतवादी घटनांत पाकचा हात नाही : पीपीपी 
>सप्टेंबर २०११ : अमेरिकेने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी एकतर्फी कारवाई करू नये. 

अमेरिकेच्या रडारवर हक्कानी नेटवर्कचे दहशतवादी अाहेत. त्यांना पकडण्यासाठी एकतर्फी कारवाई केली जाऊ नये, असे पीपीपीचे तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटले आहे. ते सरकारी दूरचित्रवाणी वाहिनीवरील एका मुलाखतीत बोलत होते. तत्पूर्वी हक्कानी नेटवर्क तालिबानचे मजबूत शस्त्र आहे, असा आरोप अमेरिकेने गिलानी यांच्या वक्तव्यापूर्वी केला होता. त्यावर गिलानींचे हे वक्तव्य जारी झाले होते. 

>सप्टेंबर २०१६ : 'आम्हाला दहशतवादाची सर्वात जास्त झळ, वानी दहशतवादी नाही' 
पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) सरकारचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला दहशतवादी कारवायांची सर्वाधिक झळ बसल्याचे म्हटले होते. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे. पण परदेशी शक्तींना पाकिस्तानच्या विकासाला अस्थिर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. हिजबुलचा कमांडर बुरहान वानी दहशतवादी नसल्याचे प्रमाणपत्रही शरीफ यांनी दिले होते. काश्मिरी युवा नेता वानीला भारतीय सैन्याने मारल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

बातम्या आणखी आहेत...