Crime / Pak / पाकिस्तानी न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या, हल्लेखोराने केला आत्महत्येचा प्रयत्न

हल्ल्यात अँकरच्या एका मित्राचाही झाला खून, आरोपी गंभीर जखमी

वृत्तसंस्था

Jul 10,2019 12:26:00 PM IST

कराची - पाकिस्तानात एका खासगी न्यूज चॅनलच्या अँकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. मुरीद अब्बास असे या अँकरचे नाव असून तो कराची येथे 'बोल न्यूज चॅनल'साठी काम करत होता. खैबन-ए-बुखारी परिसरात मंगळवारी त्याचा एका व्यक्तीशी वाद झाला. यानंतर त्या व्यक्तीने मुरीदवर हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत मुरीदला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा जीव वाचवता आला नाही. यावेळी हल्लेखोराने स्वतःवर देखील गोळी झाडली असून तो सध्या गंभीर आहे.


पोलिसांनी सांगितले, की आरोपीचे नाव आतिफ झमा आहे. आतिफ आणि मुरीदचा एका गोष्टीवरून वाद झाला होता. त्याच वादातून आतिफने मुरीदच्या पोटात एक आणि छातीत दोन गोळ्या झाडल्या. घटनास्थळी अँकर मुरीदचा आणखी एक मित्र खिज्र सुद्धा उपस्थित होता. आरोपीने त्याला देखील ठार मारले. त्यांच्या मित्रांनीच पोलिसांना या घटनेची माहिती दिली. आतिफला अटक करण्यासाठी पोलिस त्याच्या घरी पोहोचले असता त्याने स्वतःवर गोळी झाडली. त्याच्या छातीत गोळी लागली असून तो सध्या गंभीर आहे. पीडित अँकर मुरीदची पत्नी झारा अब्बास सुद्धा एका खासगी न्यूज चॅनलमध्ये अँकर आहे. झाराने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आतिफ आणि मुरीद हे दोघे बिजनेस पार्टनर होते. त्या दोघांमध्ये बिजनेसवरून वाद झाला आणि त्यातूनच मुरीदची हत्या करण्यात आली.

X
COMMENT