आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी संघटनांतील महिला युवकांना बनवतात अतिरेकी, काश्मीरमध्ये 'हनी ट्रॅप' बांदीपोरात अटक झालेल्या शाजियाचा पोलिसांसमोर खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांनी आता महिलांना आपले शस्त्र बनवले आहे. या महिला युवकांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवून दहशतवादी बनण्यासाठी चिथावतात. अधिकाऱ्यांनी सांगितले की, युवकांना फसवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शस्त्रे पोहोचवणे आणि घुसखोरांना मार्गदर्शन करणे अशी कामेही काश्मिरी मुलांकडून करवून घेतली जात आहेत. 

 

बांदीपोरा येथे १७ नोव्हेंबरला अटक केलेल्या सय्यद शाजिया नावाच्या महिलेने चौकशीत हा खुलासा केला आहे. तिने सांगितले की, काही महिला दहशतवादी संघटनांशी जोडलेल्या आहेत. त्यांच्याकडे युवकांना जाळ्यात अडकवून दहशतवादाकडे ढकलण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३०-३२ वर्षे वय असलेल्या शाजियाने फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया साइट्सवर अनेक अकाउंट तयार केले होते. काश्मीर खोऱ्यातील अनेक युवक तिला फॉलो करत होते. ती युवकांशी चर्चा करत होती. कन्साइनमेंट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याच्या अटीवर ती युवकांना भेटण्याचे आमिषही दाखवत होती. केंद्रीय सुरक्षा संस्थांना अनेक महिने शाजियाच्या आयपी अॅड्रेसची निगराणी केली होती. शाजियाच्या अटकेच्या सुमारे आठवडाभर आधी जम्मू-काश्मीर पोलिसांनी २८ वर्षांच्या आसिया जान हिलाही २० हातबॉम्बसह अटक केली होती. 

 

अनेक पोलिस कर्मचारीही अडकले होते शाजियाच्या जाळ्यात 
शाजियाने खोऱ्यातील तरुणांशिवाय अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनाही हनी ट्रॅपमध्ये अडकवले होते. त्यांच्याकडून मिळणारी माहिती ती सीमेपलीकडे बसलेल्या आपल्या हँडलर्सना देत होती. शाजियाच्या अटकेच्या आधी हंदवाडा येथून इरफान या एका विशेष पोलिस अधिकाऱ्याला पोलिसांनी उचलले होते. पोलिस आपल्या फोनवर लक्ष ठेवून आहेत, असे त्याने शाजियाला सांगितले होते. पोलिसांच्या कारवाईशी संबंधित माहितीही तो शाजियाला देत होता. मात्र, ही डबल क्रॉसची सामान्य पद्धत होती, असे पोलिस अधिकारी म्हणत आहेत. तिने जवानांच्या हालचालींची माहिती सीमेपलीकडे पोहोचवली होती. तिला जास्त संवेदनशील माहिती मिळू शकली नव्हती, असा पोलिस अधिकाऱ्यांचा दावा आहे. 

 

'लष्कर'च्या खोऱ्यातील प्रमुखाच्या मृत्यूनंतर महिलेचा अँगल समोर 
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख अबू इस्माईलचा आणि छोटा कासीमचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर पोलिसांना काही कागदपत्रे सापडली होती. त्यातून समजले होते की, उत्तर काश्मीरमधील एक महिला त्यांच्यापर्यंत शस्त्रे पोहोचवत होती. ही महिला शाजिया असल्याचे एप्रिलमध्ये स्पष्ट झाले होते. तिच्यावर नजर ठेवली असता असे कळले की, तिला सीमेपलीकडे बसलेल्या नेत्यांकडून निर्देश मिळत आहेत. ती जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी शेरवान ऊर्फ अलीच्या संपर्कात होती. अलीने तिची ओळख पाकिस्तानमध्ये बसलेल्या सूफियाँ आणि कासीम खान घौरी या दहशतवाद्यांशी करून दिली होती. त्यानंतर ती जैशची ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून सक्रिय झाली. 

बातम्या आणखी आहेत...