आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुपेडी नात्याचा प्रवास

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंतरजातीय विवाह ही मोठीच जोखीम असते. विशेषत: मुलीसाठी. कारण मुलीने लग्न करताना माहेरच्यांचा विरोध डावललेला असतो. शिवाय सासरची मंडळी कश्या पद्धतीनं स्वीकारतील,  घरात वागणूक कशी मिळेल याची शाश्वती नसते. मात्र, अशा वेळी घरातल्या मुख्य स्त्री ने अर्थातच सासूने हा विवाह स्वीकारला, सुनेला मुलगी म्हणून वागणूक दिली तर हे नातं बहरतं, फुलतं.  अशाच ‘आई’ झालेल्या सासूबद्दल सुनेनं व्यक्त केलेलं मनोगत...

 

नातं या एका शब्दात व्यक्तीच्या जन्मापासून ते मरेपर्यंतच्या प्रवासाचं गुपित दडलंय. अर्थात या नात्यात सूर गवसला तर आयुष्याचा प्रवास सुफळ संपूर्ण होतो हे वेगळं सांगायला नको. पण काही नाती विनाकारण वर्षानुवर्षे कायम चेष्टेचा विषय होऊन गेलेली असतात. सासू-सुनेचं नातं हे त्यापैकीच एक नातं. स्वाभाविकपणे लग्नानंतर सासू हा विषय नक्की कसा असेल माझ्याबाबतीत याची काळजी मलाही होतीच. अॅरेंज की लव्ह मॅरेज हे एका ठराविक काळापर्यंत स्वत:बद्दल कुणीच सांगू शकत नाही. माझ्याही बाबतीत तेच होतं. पण निलेश आयुष्यात आला आणि चित्र स्पष्ट झालं. आमच्या लग्नाला माझ्या माहेरच्यांचा आधी विरोध होता. त्यामुळे नीलेशसोबत आयुष्य हवं असेल तर बंडखोरी करून आंतरजातीय विवाह करणं भाग होतं. धाडस करून  मी माहेर सोडलं. मंदिरात अगदी साध्या पद्धतीनं, मोजक्या लोकांच्या साक्षीनं लग्न केलं.


इथपर्यंत सगळं फिल्मी स्टाइल छान वाटलं. पण खरी गंमत नंतरच होती. मी घरात धाकटी. आई-वहिनीमुळे आणि शिक्षणाच्या कारणामुळे कधी स्वयंपाकघरात गेले नव्हते. आता आपलं कसं होणार या भीतीनं मला धडकी भरली. पण माझ्या आईशी म्हणजेच सासूबाईशी माझं नातं ज्या पद्धतीनं सुरू झालं आणि बहरलं तो एक अविस्मरणीय प्रवासच म्हणावा लागेल. त्या प्रवासात आई खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या म्हणूनच आज माहेरची माणसंही मला परत मिळाली आहेत. आंतरजातीय विवाहामुळे भीती होती मनात, पण आईंचा स्वभाव, समंजसपणा, धीर ठेवण्याच्या वृत्तीमुळे सगळं सोप होतं गेलं माझ्यासाठी. माझ्या या माउलीने मला अगदी स्वयंपाक करण्यापासून ते नाती कशी समजून घ्यावीत हे सांगितलं. शिकवलं. माझ्या सासूबाई म्हणजे एक प्रयोगशाळाच होती माझ्यासाठी. सासूबाई म्हणत, कधी कधी मोठ्यांनी छोटेपणा व छोट्यांनी मोठेपणा दाखवला तर सगळं ठीक होतं. माझ्या लग्नप्रवासात त्यांनी माझी माझ्या नवऱ्याशी ओळख करून दिली. नवऱ्याशी ओळख अशामुळे म्हणतेय की प्रेमविवाहाआधी प्रत्येक मुलीला मुलगा माहिती असतो ते प्रियकर म्हणून. पण तो नवरा म्हणून कसा असेल हे संसाराला लागल्याशिवाय कळत नाही. आणि नेमकं हेच मला सासूबाईंनी शिकवलं. समजावलं. नवरा म्हणून त्याचा जन्म व विकास होताना पत्नी म्हणून मला काय करावं लागेल, काय टाळावं लागेल याची शिकवण त्यांनी मला दिली. आमचं नातं अधिक चांगलं कसं होईल यासाठी त्यांचा प्रयत्न असायचा. माझी दोन्ही बाळंतपणं  त्यांनीच पार पाडली. माझ्या  मातृत्वासोबत त्याही नव्याने मातृत्व अनुभवत होत्या. त्या काळात त्यांच्या गोंडस नातवाला बघून त्यांना झालेला आनंद मी कधीचं विसरू शकत नाही. आमच्यातलं नातं बहुपेडी होतं. त्या स्वत: मुख्याध्यापक असताना घरातला त्यांचा वावर हा पत्नी, आई, आजी,मैत्रीण असाच होता. खुपच सकारात्मकता होती. लग्नामुळे माझं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. लग्नानंतर १० वर्षांचा खंड होऊनही मी जेव्हा अर्धवट शिक्षणाचा प्रवासात होते  तेव्हा तर त्याही माझ्याबरोबरीने माझं स्वप्न जगत होत्या. माझ्या प्रत्येक यशाचा त्यांना अभिमान होता. कुठलंही नातं टिकवायचं असेल तर त्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न हवेत. आपल्या मनासारखं सासरी घडावं अशी अपेक्षा करताना आपण स्वत: सासरच्या मंडळींसाठी किती तडजोडी करतो आहोत याचं आजकालच्या सुनांनी आत्मपरीक्षण करायला हवं असं मला वाटतं. आज सासूबाई आमच्यात नाहीत. मात्र प्रत्येक प्रसंगात  पाठीशी खंबीर उभं राहणारी सासू प्रत्येक जन्मी मिळावी यासाठी एखाद्या व्रताची व्यवस्था असायला हवी होती आपल्या संस्कृतीत..

 

वाचकांना आवाहन
> लग्नानंतर सासरी अॅडजस्ट व्हायला तुम्हाला सासूनं कशी मदत केली?
> सासूसोबतच नातं कसं डेव्हलप होत गेलं?
> तुमच्यातले मतभेदाचे प्रसंग तुम्ही दोघींनी  कसे हाताळले?
> आधुनिक सुनांच्या भुमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं?
> आजघडीला तुमच्या आयुष्यात सासूचं काय स्थान आहे?
> मोजक्या शब्दात फोटोसह आम्हाला लिहून कळवा. पत्ता शेवटच्या पानावर. .