पुणे / पंढरीची वाट : देहूतून तुकोबांच्या पालखीचे रिमझिम सरींच्या साथीने प्रस्थान

माउलींची पालखी आज आळंदीतून निघणार

प्रतिनिधी

Jun 25,2019 10:54:00 AM IST

पुणे - जय हरी विठ्ठल, विठोबा रखुमाई..असा जयघोष करत, हजारो वारकऱ्यांचा भक्तिभाव जागृत करत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास श्रीक्षेत्र देहू येथून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे विधिवत प्रस्थान झाले. मुखी हरिनाम, हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा, डोईवर तुळशीवृंदावन आणि मनात भोळा भक्तिभाव जपत हजारो वारकऱ्यांनी तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेतले.


क्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरात सोमवारी पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर पाच वाजल्यापासून मुख्य मंदिर, शिळा मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिरात महापूजा बांधल्या गेल्या. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक मानले जाणाऱ्या नारायण महाराज समाधी मंदिरातही महापूजा करण्यात आली. अकरा वाजता इनामदार वाड्यातून तुकोबांच्या पादुका देऊळवाड्यात आणण्यात आल्या आणि विठुमाउलीच्या जयघोषात, तुकोबांचे अभंग गायन करत, देऊळवाड्यातील भजनी मंदिरात प्रस्थान सोहळा साजरा झाला. त्यानंतर पादुकांच्या दर्शनासाठी झुंबड उडाली. सायंकाळी पाचनंतर पादुकांच्या मंदिर प्रदक्षिणेला प्रारंभ झाला आणि सायंकाळी उशिरा पहिल्या मुक्कामासाठी तुकोबांचा पालखी सोहळा देहू येथील इनामदारवाड्यात विसावला. मंगळवारी सकाळी तुकोबांचा पालखी सोहळा पिंपरी चिंचवडच्या दिशेने प्रवास सुरू करणार आहे. दुसरा मुक्काम आकुर्डी येथे होणार आहे.

माउलींची पालखी आज आळंदीतून निघणार

पंढरीच्या श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी अधीर झालेल्या लक्षावधी वारकऱ्यांची मांदियाळी अलंकापुरीत जमली असून मंगळवारी माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. पहाटेपासून मुख्य मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी चाडेचारनंतर माउलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होईल. इंद्रायणीचे दोन्ही काठ माउलींच्या नामघोषाने दुमदुमले आहेत.


आळंदी देवस्थान कमिटीचे विश्वस्त विश्वास ढगे पाटील म्हणाले, ‘भाविकांच्या स्वागताची आणि सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. वारकऱ्यांची सुरक्षा आणि त्यांना सुविधा देणे हे आमचे प्राधान्यक्रम आहेत. मंगळवारी दुपारी चार वाजता प्रस्थानमुहूर्त आहे. प्रस्थान सोहळ्याचे दर्शन भाविकांना घडावे यासाठी मोठे स्क्रीन कमिटीच्या वतीने उभारण्यात आले आहेत.

विठ्ठल माउली यात्रा अॅप
प्रस्थान सोहळा तसेच पुढील वाटचालीतील घडामोडी सर्वांना सहजपणे समजाव्यात यासाठी ‘विठ्ठल माउली यात्रा’ हे अॅप तयार केल्याची माहिती सोहळाप्रमुख योगेश देसाई यांनी दिली. दिंड्यांच्या वाहनांचे नंबर, दिंडीप्रमुखाचे नाव, संपर्क, जीपीएस लोकेशन आदी तपशील अॅपमध्ये समाविष्ट आहे.

X
COMMENT