आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारकऱ्यांना विश्वासात घेऊन विठ्ठलमूर्तीस लेप प्रक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश भंडारकवठेकर | पंढरपूर  वारकरी संप्रदायातील महाराज मंडळींना विश्वासात घेऊन श्री विठ्ठलमूर्तीचे संवर्धन करण्यासाठी आणखी एकदा रासायनिक लेप प्रक्रिया करण्याचा निर्णय विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. बैठकीला मंदिर समितीचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी आणि इतर काही सदस्य गैरहजर होते. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी होणार की नाही, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित  होत आहे.   औसेकर म्हणाले, पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी संपूर्ण मंदिराची व विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तींची पाहणी केली होती. त्यानंतर मूर्ती संवर्धन करण्याच्या संदर्भात सूचना समितीस दिल्या होत्या. त्यानुसार मंदिर समितीच्या बैठकीत हा विषय चर्चेसाठी आला. विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू आहे. त्यामुळे पुरातन मूर्तीचे संवर्धन करण्याची जबाबदारी मंदिर समितीवर असल्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.  लेप प्रक्रियेबाबत लवकरच मंदिर समितीच्या सल्लागार, विविध महाराज मंडळींची एकत्र बैठक घेऊन याविषयीच्या सूचना घेतल्या जाणार आहेत.  बैठकीस नगराध्यक्षा साधना भोसले, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, अॅड. माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आदी उपस्थित होते.

पूजेची आजची स्थिती  
पूर्वी मंदिरात केल्या जाणाऱ्या महापूजांमुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याचे लक्षात येताच त्या त्या काळात कार्यान्वित असलेल्या मंदिर समितीच्या वतीने विविध उपाययोजना झाल्या. त्याचाच एक भाग म्हणून साधारणपणे पाच ते सहा वर्षांपासून भाविकांकडून केली जाणारी विठ्ठलाची महापूजा बंद करण्यात आली.

1998 नंतरच्या पहिल्या लेप प्रक्रियेनंतर चौथ्यांदा होणार हाेती प्रक्रिया 
श्री विठ्ठल व रुक्मिणी मूर्तीची पुणे येथील डेक्कन काॅलेज व औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाकडून मध्यंतरी पाहणी करून आवश्यकतेनुसार वज्रलेप करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. १९९८ नंतरच्या पहिल्या लेप प्रक्रियेनंतर २१ वर्षांत चौथ्यांदा लेप प्रक्रिया केली जाणार होती. त्यानंतर पुन्हा हा निर्णय प्रलंबित पडला. मात्र, आता मंदिर समितीच्या बैठकीनंतर पुन्हा हा विषय पुढे आला आहे.

मूर्तीची यापूर्वीही केली लेप प्रक्रिया   
श्री विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याचे लक्षात येताच मंदिर समितीच्या वतीने पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून १९९८ मध्ये श्री विठ्ठलमूर्तीवर पहिल्यांदा वज्रलेप करून घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तज्ज्ञांच्या मदतीने २००५ मध्ये विठ्ठलाच्या मूर्तीवर सिलिकाॅन लेप देण्यात आला होता. मध्यंतरी २०१२ मध्ये औरंगाबाद येथील पुरातत्त्व विभागाकडून तिसऱ्यांदा वँकर बीएस २९० हे रसायन वापरून लेप लावण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...