आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विठुरायाच्या महापूजेची 8 महिन्यापर्यंत बुकिंग फुल्ल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर - महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व गरिबांचा देव समजल्या जाणाऱ्या पंढरीच्या विठुरायाची महापूजा करण्यासाठी ऑक्टोबर २०१९ पर्यंतच्या तारखांचे वेळापत्रक फुल्ल झाले आहे.  मात्र, मंदिर समितीच्या वतीने दरवर्षी गुढीपाडव्यापासून मृग नक्षत्रापर्यंत केल्या जात असलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या चंदनउटी पूजा करण्यासाठी सध्या बुकिंग सुरू आहे. 

चंदनाच्या वाढलेल्या दरांमुळे चंदन उटीपूजेच्या शुल्कात मंदिर समितीकडून वाढ करण्यात आली आहे. विठ्ठलपूजा १५ वरून २१ हजार आणि रुक्मिणी पूजा साडेसातवरून ११ हजार रुपये करण्यात आली आहे.    


विठ्ठलाच्या महापूजेसाठी भाविक सोयीची तारीख अगोदरच पैसे भरून बुक करतात. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंतचे बुकिंग हाऊसफुल्ल झाले असून  नोव्हेंबर, डिसेंबर या दोन महिन्यांतील काही तारखा शिल्लक आहेत.  

 
रोज एक याप्रमाणे महापूजेचे बुकिंग केले जाते. यासाठी २५  हजार रुपये शुल्क आहे. एका कुटुंबातील १० व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जातो. महिला व युवतींनी साडी परिधान करणे सक्तीचे आहे. एका दांपत्यास महापूजा करण्याचे व इतर नातेवाइकांना हात लावण्याचे भाग्य लाभते. पहाटे ३.३० वाजता मंदिरात येण्याचे बंधन आहे. महापूजेसाठी एक तासाचा वेळ लागतो. चैत्र पाडव्यापासून होणाऱ्या विठोबा-रखुमाईच्या चंदनउटी पूजेचे बुकिंग सुरू आहे. या पूजेसाठी प्रत्येकी २१ हजार, तर रुक्मिणी मातेच्या चंदनउटी पूजेसाठी ११ हजार रुपये शुल्क आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या पूजा चैत्री  यात्रा कालावधी वगळून होतील. दुपारी ३.३० वाजता चंदनउटी पूजा केली जाते. या पूजेसाठी दहा भाविकांना गाभाऱ्यात उपस्थित राहता येते, अशी माहिती श्री विठ्ठल मंदिरातील नित्योपचार प्रमुख संजय कोकीळ यांनी दिली.    


चंदनउटी पूजा शुल्कात सहा हजार रुपयांपर्यंत वाढ  
या वर्षी चंदनाच्या वाढलेल्या दरांमुळे चंदनउटी पूजेच्या शुल्कात मंदिर समितीकडून घसघशीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेसाठी २१ हजार, तर रुक्मिणीच्या चंदनउटी पूजेसाठी ११ हजार रुपये एवढे शुल्क या वर्षी आकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेच्या शुल्कात सहा हजार, तर रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी साडेतीन हजार रुपये भाविकांना जास्तीचे मोजावे लागणार आहेत.


पूजेतून ७५ लाखांचे उत्पन्न  
मागील वर्षी २०१८  मध्ये साधारणपणे यात्रा कालावधी वगळून वर्षभरात सुमारे ३०० महापूजा सर्वसामान्य वारकरी भाविकांनी केल्या होत्या. मंदिर समितीला त्यातून ७५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.  

बातम्या आणखी आहेत...