आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंढरपूर - आजच्या जगात सरळमार्गी माणूस भेटणं हे विरळच होत आहे. मानवजात ही सरळ पाऊल टाकत टाकत नकळत उलटं पाऊल टाकतो व चुकून पडले म्हणून जगाला सांगतो. पण एक व्यक्ती गुरुवारी वाखरी (ता.पंढरपूर ) येथे भेटली. ती तब्बल ३३ वर्षे आळंदी ते पंढरपूर अशी वारी करीत आहे. अकरा वर्षे सरळ चालत आणि उर्वरित २२ वर्षे उलटे चालत आता वारी करत आहेत हे विशेष.
बापूराव दगडोपंत गुंड (५२, रा. फुरसुंगी, ता. हवेली जि.पुणे) असे या अवलिया भक्ताचे नाव आहे. फुरुसुंगीत त्यांचे कपड्याचे दुकान आहे. एक मुलगा इंटरिअर डिझायनर व मुलगी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात आहे. प्रपंच्याच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडीत हा अवलिया सावळ्या विठ्ठलाच्या भेटीला उलटे चालत आला आहे. आळंदीपासून त्यांनी वारीला सुरुवात केली आहे. गेली सहा दिवस ते उलटे पायी चालत आहेत. दररोज तीस ते पस्तीस किलोमीटर अशा पध्दतीने उलटे चालत अंतर पार करीत पंढरपुरात ते दाखल झालेले आहेत.
दरम्यान, त्यांना पाहण्यासाठी वाखरी येथे नागरिकांनी गर्दी केली होती. तिथे श्री. गुंड यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले, विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा देव आहे. त्यामुळेच तर विठुरायाला गरिबांचा बालाजी म्हणून संबोधले जाते. गरिबांचा हा देव भक्तांच्या हाकेला नेहमी धावून जातो आहे. त्याला नवस बोलावा आणि करावा लागत नाही. त्यामुळे आपण गेल्या तेहतीस वर्षापासून आपल्या परमप्रिय देवाच्या भेटीला येत आहे. जातीभेद, पंथ,वर्ण भेद मानू नये. मानव जात ही महत्त्वाची आहे, हा संदेश देत उलटे चालत वारी करीत आहे. पंढरीत विठ्ठल मंदिरालाही उलटे चालत त्यांनी प्रदक्षिणा केली. विठ्ठलाचे दर्शन घेऊन ते येथील एस.टी.स्थानका पर्यंत तशाच रीतीने चालत जाऊन एसटीत विराजमान झाले. सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.
४८ दिवसांत गाठले होते पुणे ते दिल्ली
या अगोदर २०१७ मध्ये ४८ दिवस उलटे चालत पुणे ते दिल्ली असा त्यांनी प्रवास केल्याचे सांगितले. दिल्ली दौऱ्यामध्ये भारताच्या राष्ट्रपतींना आपण विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. या मध्ये स्वत:साठी काही मागितले नाही तर आपली प्रमुख मागणी आळंदी-पंढरपूर आणि देहू-पंढरपूर हे मार्ग सहा पदरी व्हावेत, राज्यातील पोलिसांना आठ तासांची ड्युटी व्हावी. या आणि समाजासाठी उपयुक्त याेजना राबव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.