Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Pandurang Sugar Factory gives 145 rupees more than FRP

पांडुरंग साखर कारखान्याने दिला एफआरपीपेक्षा १४५ रुपये जादा दर

दिव्य मराठी | Update - Aug 21, 2018, 12:20 PM IST

श्रीपूर येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा १४५ रुपये जादाने ऊस दर अदा केला आहे.

  • Pandurang Sugar Factory gives 145 rupees more than FRP

    अकलूज- श्रीपूर येथील श्री पांडुरंग साखर कारखान्याने एफआरपी पेक्षा १४५ रुपये जादाने ऊस दर अदा केला आहे. त्यामुळे आतापर्यंत प्रती टनास दोन हजार ३०० रुपये शेतकऱ्यांना अदा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सुधाकर परिचारक यांनी दिली. एफआरपीपेक्षा १४५ रुपये जास्तीचे देणारा हा जिल्ह्यातील एकमेव कारखाना आहे.


    कारखान्याने सरत्या हंगामात ९ लाख ५१ हजार टन उसाचे गाळप केले होते. ११.६० टक्के एवढा जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा या कारखान्यास मिळाला होता. ११ लाख ३ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ६ कोटी ४२ लाख युनिट वीज तयार करून अासवनी प्रकल्पातून ९२ लाख लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले. कारखान्याची एफआरपी २ हजार १५५ रुपये प्रति टनास याप्रमाने निघत आहे. ती यापूर्वीच अदा केली आहे. १४५ रुपयांचा हप्ता ऊस उत्पादकांच्या नावे सोमवारी वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे २०१७-१८ च्या हंगामासाठी पांडुरंगने २ हजार ३०० रुपये ऊस बिलापोटी आतापर्यंत दिले आहेत. एफआरपीपेक्षा वाढीव १४५ रुपये देण्यासाठी कारखान्याने नऊ कोटी रुपये ऊस उत्पादकांच्या नावे वर्ग केल्याचे सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितले. पांडुरंग कारखान्याने इतर कारखान्यांना सुमारे दीड लाख टन ऊस दिला होता. त्या उसालाही जास्तीची एफआरपी देण्यात आली आहे. आगामी हंगाम १ आॅक्टोबरपासून सुरू करण्यासाठी कारखाना सज्ज असून, ११ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असल्याचे कार्यकारी संचालक यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.

Trending