पांगरा शिंदेसह 6 / पांगरा शिंदेसह 6 गावांना भूकंपाचा सौम्य धक्का: 2.6 रिश्टर स्केलची नोंद; नागरिकांत भीती

Nov 11,2018 09:32:00 AM IST

हिंगोली - अनेक दिवसांपासून वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह सुमारे २२ गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत. आजची ही दहावी वेळ आहे. शुक्रवारी दुपारी १ वाजून २३ मिनिटाला भूकंप झाला. तर सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटाला पिंपरदरी येथे दुसरा धक्का बसल्याने गावातील नागरिक सैरावैरा पळत होते, तर सततच्या या भूकंपामुळे ऐन सणासुदीत आलेले पाहुणे भयभीत झाल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. या भूकंपाची नोंद लातूर येथील भूमापन केंद्रात झाली.


काही दिवसांपासून पांगरा शिंदेसह वापटी, कुपटी, शिरळी, खापरखेडा, खंबाळा, राजवाडी, तर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा आशा गावांना सतत या ना त्या कारणाने कधी भूकंपाचे सौम्य धक्के तर कधी भूगर्भातून गूढ आवाज निघण्याची जणू काही मालिका सुरू आहे. मात्र या गूढ आवाजाचे रहस्य उलगडण्यासाठी शास्त्रज्ञांनीही येऊन पाहणी केली होती. मात्र अद्यापपर्यंत याचा सुगावा लागला नाही. तर काहींनी सांगितले की, भूगर्भात पोकळी निर्माण झाल्याने असे गूढ आवाज निघत असल्याचे सांगितले जाते. पुन्हा सायंकाळी पाचच्या सुमारास पिंपळदरी येथेही भूकंप झाला आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी भूकंप झाल्याने गावकरी मिळेल त्या मोकळ्या ठिकाणी जात होते, तर बोल्डा येथे आठवडी बाजार असल्याने बहुतांश गावकरी बाजारात गेले तर काही शेताकडे गेले होते.

भाऊबीजेसाठी आलेले तेवढे पाहुणे घरी होते. त्यांना या भूकंपाबाबत काहीही माहीत नव्हते. मात्र अचानक भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने घरातील भांडे खाली पडले तर बसल्या ठिकाणी हादरे जाणवल्याने तेही घाबरून गेले आणि बाहेर मोकळ्या जागेत बराच वेळ घालविला. शुक्रवारी झालेल्या भूकंपाची नोंद मात्र अधिक तीव्रतेचा जरी नसला तरी नागरिक भयभीत झाले आहेत. या भूकंपाची २.६ रिश्टर स्केल ची नोंद लातूर येथील भूमापन केंद्रावर झाल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

प्रशासन सज्ज
नैसर्गिक घटना घडल्या असतील तर यासाठी प्रशासन सज्ज आहे. यापूर्वी ही भूकंपाचा सौम्य धक्का बसला होता. त्यामुळे आम्ही याबाबत विनंती केल्यानुसार नांदेड येथील गुरू गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शास्त्रज्ञही येऊन गेले होते. त्यांनी पाहणीही केली असून अहवाल मात्र अद्याप पाठवला नाही, परंतु नैसर्गिक अापत्ती निवारणासाठी प्रशासन सज्ज आहे.
- ज्योती पवार, तहसीलदार, वसमत

X