आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चटपटीत पाणीपुरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

गल्लीत, जागोजागी, टपऱ्यांवर  सहज आणि स्वस्त मिळणारा पदार्थ ‘किंग ऑफ द स्नॅक्स’ म्हणजे आपली आवडती चटपटीत पाणीपुरी. नक्की कुठून आला हा पदार्थ? काय आहे या पदार्थाचा इतिहास? जाणून घेऊयात...


प्रत्येक ठिकाणी सहज मिळणारा पाणीपुरी हा पदार्थ किती जुना असावा याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. आपल्या आवडत्या पाणीपुरीची नावंही त्या-त्या प्रदेशानुसार बदलत जातात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात याला ‘पाणीपुरी’ म्हणतात. बिहार, झारखंड आणि बंगालमध्ये याला ‘पुचका’ असं नाव आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश भागात याला ‘गोलगप्पे’ म्हणतात. हरियाणाच्या काही भागात याला ‘पानी के बतासे’ म्हणतात. हैदराबाद, झारखंडमध्ये याला “गुपचूप’ म्हणतात. सर्वात मजेशीर म्हणजे उत्तर प्रदेशात अलिगडमध्ये याला ‘पडका’ असे नाव आहे. 

ही तर झाली पाणीपुरीची वेगवेगळी नावं, पण ह्या पदार्थाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारे बनविले जाते. महाराष्ट्रात मुंबईमध्ये गरम पाणीपुरी प्रसिद्ध आहे. यात पुरीमध्ये भरला जाणारा बटाट्याचा मसाला गरम असतो. तर महाराष्ट्रातील इतर भागात तो क्वचितच  मिळेल. बंगालमध्ये मिळणारा पुचका हा एकाच प्रकारचा असतो. तिथे पुचक्याचे तीखा, मीठा प्रकार नसतात.  भारताच्या उत्तरेला गेलो तर तीखा आणि मीठा पानी, खट्टा पानी, खजूर का पानी, पुदिना पानी असे प्रकार चाखायला मिळतात. तर हैदराबाद आणि इतर भागात आंबट आणि झणझणीत असते. तात्पर्य हे की, जितके प्रदेश आणि व्यक्ती तितके पाणीपुरीचे प्रकार. पण ह्या पदार्थाचा इतिहास आहे काय? याचा मूळ इतिहास सांगणे कठीण आहे. पण पाणीपुरी पदार्थ भारतीय आहे हे मात्र नक्की! 

हा पदार्थ मगध प्रदेशात जन्माला आला.  प्राचीन भारतात १६ महाजन पदांपैकी गंगा नदीच्या काठावर वसलेल्या मगध प्रदेशात पाणीपुरीचे अस्तित्व होते. ग्रीक आणि चायनीज इतिहासकारांनी पाणीपुरीचा उल्लेख त्यांच्या प्रवासवर्णनांमध्ये केल्याचे पुरावेसुद्धा सापडलेले आहेत. त्या काळी जेव्हा तांदळाचा चिवडा, चितबा पिठ्हो असले पदार्थ जन्मास येत होते; तेव्हाच पाणीपुरीची चांगल्यात  चांगली चवसुद्धा राखली जात होती. खरे तर अनेकांनी हा पदार्थ जपला. यावर प्रेम केलं. पाणीपुरी आज भारताची शान आहे.

प्राचीन काळापासून आपल्या सगळ्यांचा हा लाडका पदार्थ कालानुरूप नवनवीन रूप घेत आलेला आहे, आणि आता तर तो बाहेर देशांमध्ये  ‘वॉटर बॉल्स’ म्हणून सुद्धा प्रसिद्ध झालाय. कधी तो चॉकलेट पाणीपुरी म्हणून, तर कधी व्होडका  पाणीपुरी म्हणून खाल्ला  जातो. अख्ख्या भारतावर राज्य करणारी आपली ही प्राचीन फास्टफूड डिश आजही पिझ्झा, नूडल्स, बर्गर आणि इतर पदार्थांच्या वर आपलं एक वेगळ स्थान टिकवून आहे. बघा, सुटले ना तुमच्याही तोंडाला पाणी ? तर  बनवा आता घरच्या घरी पाणीपुरी.  

साहित्य

  • पुरीसाठी : मैदा - १ वाटी, बारीक रवा १ वाटी, मीठ चवीनुसार, तेल - तळण्यासाठी
  • पाणीपुरीचे पाणी : पुदिना पाने - एक मूठ, कोथिंबीर - २ मुठी, हिरव्या मिरच्या - ४, काळे मीठ १ चमचा
  • चिंच-गुळाचे पाणी : चिंच १ लिंबाएवढी, गूळ २ लिंबांएवढा, जिरे पावडर १ चमचा,पांढरे मीठ १/२ चमचा
  • रगडा : पांढरे वाटाणे - १/४ वाटी कांदा - १ टोमॅटो - २ आलं-लसूण पेस्ट - १/२ चमचा - पाव वाटी तिखट - १/२ चमचा, हळद - १/४ चमचा छोले मसाला - १ चमचा.

कृती 

  • पुऱ्या-मैदा, रवा आणि मीठ एकत्र करून घट्ट भिजवा. त्याची पातळ पोळी लाटून एखाद्या छोट्या झाकणाने पुऱ्या कापून घ्या. मध्यम आचेवर तेल तापवून सोनेरी रंगावर तळून घ्या.

पाणीपुरीचे पाणी 

  • पुदिना, कोथिंबीर, मिरच्या बारीक चिरून मिक्सरवर बारीक करून घ्या. एखाद्या बारीक गाळणीतून वरील मिश्रण गाळून घ्या. गाळलेल्या पाण्यात काळे मीठ चवीनुसार मिसळून थंड पाण्याने हे गाळलेले पाणी पातळ करून घ्या.

चिंच-गुळाचे पाणी  

  • चिंच आणि गुळात थोडे पाणी घालून शिजवून घ्या. गॅसवरून खाली उतरवून थंड होऊ द्या. थंड झाल्यावर चिंच हाताने कुस्करून मिश्रण गाळणीने गाळून घ्या. त्यात आता जिरे पावडर आणि मीठ घालून चव जुळवून आणा.

रगडा

  • वाटाणे किंचित सोडा घालून ५-६ तास भिजत घाला. नंतर, कुकरमध्ये किंवा ओपन शिजवून घ्या. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल तापवून त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतला की आलं-लसूण पेस्ट परतून घ्या. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो त्यात घालून वरून चवीनुसार मीठ घाला आणि टोमॅटो शिजेपर्यंत परता. टोमॅटो शिजून एकजीव झाला की त्यात तिखट, हळद, छोले मसाला घालून तेल सुटेपर्यंत परता. आता यात शिजवलेले वाटाणे घाला. जास्त पाणी घालू नका. घट्टसरच ठेवा. किंचित उकळून खाली उतरवा. आता, तीन वाट्यांमध्ये चिंच-गुळाचे पाणी, पुदिना-कोथिंबीर पाणी आणि रगडा काढून त्याबरोबर बशीत ७-८ पुऱ्या सजवून सर्व्ह करा.

(संदर्भ-इंटरनेट)