आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड डेस्कः दिग्दर्शक आशुतोष गोवारिकरांच्या ‘पानिपत: द ग्रेट बेट्रेयल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघा आठवडा राहिला आहे. पण प्रदर्शनाच्या आठवड्याभरापूर्वीच या चित्रपटावर वादाचे संकट ओढवले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमधील मस्तानीविषयीच्या संवादावर बाजीराव पेशव्यांच्या वंशजांनी आक्षेप घेतला आहे. याविरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे. त्याला उत्तर न दिल्यास कोर्टात धाव घेण्याचा इशारा बाजीराव पेशव्यांच्या आठव्या पिढीचे वंशज नवाब शादाब अली बहादूर यांनी दिला आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री क्रिती सेननच्या तोंडी असलेल्या संवादावर त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी चित्रपटाच्या निर्मात्या सुनीता गोवारिकर, रोहित शेलाटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांना नोटिस पाठवून वादग्रस्त संवाद चित्रपटातून काढण्याची मागणी केली आहे.
या चित्रपटात क्रिती सेननने सदाशिवरावांची पत्नी पार्वतीबाईंची भूमिका साकारली आहे. चित्रपटात “मैने सुना है जब पेशवा अकेले मोहिम पर जाते है तो एक मस्तानी के साथ लौटते है”, हा संवाद आहे. “चित्रपटात हा संवाद अत्यंत चुकीच्या अर्थाने वापरला गेला असून त्याला माझा विरोध आहे. या संवादातून मस्तानी साहिबांसोबतच पेशव्यांचीही चुकीची प्रतिमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचते. मस्तानीबाई या बाजीराव पेशव्यांच्या पत्नी होत्या. चित्रपट आणि ट्रेलरमधील हा संवाद वगळण्याविषयीची नोटीस मी निर्माते व दिग्दर्शकांना पाठवली आहे. त्यांनी नोटीसीला प्रतिसाद न दिल्यास मी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेईन”, असं वक्तव्य नवाब शादाब अली बहादूर यांनी केलंय.
महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेंट यांच्याविरोधात कथा चोरीचा आरोप करुन केस दाखल केली आहे. 'पानिपत' नावाने विश्वास यांच्या कादंबरीची 10 हिंदी आवृत्ती आणि 41 मराठी अावृत्ती आली आहे. त्यांच्या कादंबरीवर एनएसडीचे डायरेक्टर वामन केंद्रे यांनी 20 वर्षांपूर्वी 'रननगन' नावाने नाटक बनवले होते. त्याचे 400 पेक्षा जास्त शो मराठीत आणि हिंदी झाले आहेत. त्यामुळे विश्वास यांना 'पानिपतकार'ची उपाधी मिळाली आहे.
दिव्य मराठीशी बोलताना विश्वास पाटील यांनी सांगितले होते,'गेल्या वर्षी निर्माते रोहित शेलाटकर यांचे प्रतिनिधी संजय पाटील माझ्याकडे आले होते. ते या चित्रपटाचे स्क्रिप्ट रायटरदेखील आहेत. लेखक म्हणून माझे नावदेखील त्यात घेतले जाईल, असे त्यांनी सांगितले होते. हा चित्रपट कादंबरीवर आधारित असल्याचे लिहिले जाईल. तेव्हा मी तोंडी परवानगी दिली होती. त्यानंतर संजयने स्क्रिप्ट तयार केली. स्क्रिप्ट रीडिंग 15 ऑगस्ट 2017 रोजी झाले होते. आता मी ट्रेलर पाहिला तेव्हा मला कळाले, सर्व संवाद कांदबरीतून घेण्यात आले आहेत. मी त्या वेळी बेसिक प्रेमाइसची परवानगी दिली होती, मात्र येथे माझ्याच पुस्तकातील सर्व संवाद घेतले आहेत. त्यामुळे मी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. माझ्या वकिलानेही सात कोटींची नुकसान भरपाई मागितली आहे. पानिपतची तिसरी लढाई कादंबरीच्या रूपात लिहायला मला सहा वर्षे लागली. मी त्याचा प्रचंड अभ्यास केला होता. पराभवाचे मी विजयात रूपांतर केले. मराठे सैनिक कशा प्रकारे धाडसाने लढले हे मी कादंबरीत मांडले हाेते. नजीम खान, अब्दालीसारखी पात्रे माझ्या कादंबरीतील आहेत.
पानिपतच्या तिस-या युद्धावर आधारित हा चित्रपट 6 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अर्जुन कपूरने पेशवे सदाशिव रावांची भूमिका वठवली आहे, तर कृती सेनन त्यांची पत्नी पार्वतीबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्तने या चित्रपटात अहमद शाह अब्दालीची भूमिका साकारली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.