आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्रांच्या विराेधात पंकजांची आघाडी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळीतील गोपीनाथ मुंडे जयंती कार्यक्रमात 'मी पक्ष सोडणार नाही' असे ठणकावून सांगणाऱ्या पंकजा मुंडे यांनी प्रत्यक्ष न बोलताही 'आता पक्ष धरणारही नाही' हेच अधिक ठणकावून सांगितले. खरे तर त्या पक्ष साेडणार नाहीत, याची कल्पना सर्वांनाच होती. देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या टीका करतील, हा अंदाजही आधीच व्यक्त झाला होता. तेच त्यांनी केले. पण ते करीत असताना पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी जी काही विधाने केलीत ती पक्षाला विचार करायला लावणारी आहेत. पक्षात लोकशाही राहिलेली नाही, हे त्यांनी अधोरेखित केले. राजकीय पक्ष ही एक प्रक्रिया असते. तिथे लोक येतात आणि जातात. पण हे भान गेल्या पाच वर्षांत निर्णय घेणाऱ्यांना राहिले नाही, असेही त्यांनी फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे सुनावले. मूठभरांचा हा पक्ष गोपीनाथरावांनी जनसामान्यांचा केला. त्यांच्यानंतर आता तो पुन्हा मूठभरांचा पक्ष करण्यात आला आहे, हेही त्यांनी आवर्जून सांगितले. हे सर्व ऐकायला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वत: हजर होते हे विशेष. प्रदेशाध्यक्षांना ते मान्य होते की नाही आणि मान्य असेल तर त्यात बदल करण्याचे अधिकार तरी त्यांच्याकडे आहेत का, हे प्रश्न आता उपस्थित होतील. या निमित्ताने पंकजा यांनी त्यांच्या समर्थक कार्यकर्ते आणि नेत्यांना जो संदेश द्यायचा तो तर दिलाच, पण ज्यांच्यापर्यंत ज्या शब्दात पाेहोचवायचा तोदेखील व्यवस्थित पोचवला आहे. पंकजा यांनी भाजपच्या 'कोअर कमिटी'चाही जाहीरपणे राजीनामा दिला. आपण विधान परिषदेसाठी आणि तिथल्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दबाव आणतो आहोत, अशा बातम्यांनी व्यथित होऊन हा राजीनामा दिला आहे, असे त्यांनी सांगितले. तुम्ही द्याल त्या पदांनी आपण मोठे होऊ या भ्रमात राहू नका, हेच या राजीनाम्याच्या माध्यमातून त्यांनी संबंधितांना सांगितले. आपल्या नेतृत्वाला तुमच्या पदाचीच काय, तुमच्या पक्षाचीही गरज नाही, हे दाखवून देण्याचा निर्धारही त्यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या घोषणेतून केला आहे. या प्रतिष्ठानच्याच माध्यमातून आपण आता राज्यभर 'मशाल' घेऊन फिरणार आहोत, ही घोषणा त्यांनी केली. या घोषणेतली मशाल नव्या क्रांतीचे प्रतीक म्हणून त्या वापरताहेत. 'होय, मी बंड केले; पण स्वत:ला पद मिळवण्यासाठी नाही' हे भाषणातून सांगणाऱ्या पंकजा आता त्याहीपुढे जाऊ पाहत आहेत. म्हणूनच गोपीनाथ मुंडे यांच्या नावाची झूल त्यांनी आज उतरवून ठेवली. प्रचंड मोठ्या जनसमुदायाला नेतृत्व देण्याची ताकद आपल्यात ठासून भरली आहे हे त्या स्वकर्तृत्वाने सिद्ध करून देऊ पाहताहेत. पंकजा या गोपीनाथरावांच्या नावावर राजकारण करतात आणि त्यातून मोठ्या होऊ पाहतात ही छुप्या विरोधकांची टीका त्यांना फोल ठरवायची आहे आणि त्या दिशेने त्यांनी या मेळाव्यातून पहिले पाऊल टाकले आहे. गोपीनाथ मुंडे स्मारक आता करू नका. त्याऐवजी मराठवाड्याला दुष्काळमुक्त करा, या मागणीचा अर्थच तो आहे. हे राज्याच्या राजकारणाला मिळत असलेले नवे वळण आहे का, हे मात्र काळच ठरवेल.