आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्ही तो पेटवावा...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंकज शिंदे

अनेक महनीय व्यक्तींनी आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रात वन्ही पेटवण्याचे कार्य करून आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आपल्या आजूबाजूलादेखील अशा हजारो समस्या आहेत, गरज आहे ती फक्त 'वन्ही तो पेटवण्याची'! ‘वन्ही तो पेटवावा पेटता पेटता पेटत असे'  असे एक सुवचन आहे. अगदी ओल्या लाकडातूनसुद्धा अग्नी पेटवता येतो; गरज असते ती फक्त पेटवण्याची; सुरुवात करण्याची; प्रारंभीचे पहिले पाऊल टाकण्याची.एकदा का अग्नी प्रज्वलित झाला तर मग नंतर पेटता पेटता तो सारे काही गिळंकृत करत असतो. अगदी मानवी क्रांतीप्रमाणेच! एकदा का मानवाने ठरवून सुरुवात केली की क्रांती पेटलीच म्हणून समजावे. शेकडो वर्षांची अनियंत्रित राजेशाही राजवट फ्रेंच राज्यक्रांती व रशियन राज्यक्रांतीने उलथवून टाकलीच ना! १८६५ च्या बराकपूरच्या छावणीत मंगल पांडेच्या उठावाच्या ठिणगीने भारतीय स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडाचा अग्नी प्रज्वलित केला अन् सरतेशेवटी १९४७ मध्ये त्याच यज्ञकुंडात अन्यायी, अत्याचारी ब्रिटिश राजवट भस्मसात होऊन स्वातंत्र्याची नवी पहाट उगवलीच ना! तोरणा जिंकून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या प्रयत्नांचा वन्ही तो पेटवलाच होता की! म्हणूनच योग्य व प्रयत्नपूर्वक सुरुवात फक्त महत्त्वाची. आपण फक्त “वन्ही तो  पेटवावा'! पाकिस्तानच्या स्वर्ग समजल्या जाणाऱ्या स्वान्त प्रांतात कट्टर धर्मांधता बाळगणाऱ्या, क्रूर तालिबानींना सर्व जनता घाबरत असे. त्याच धर्तीवर "एक पेन, एक पुस्तक व एक शिक्षक जग बदलू शकतात' हा ध्यास घेऊन मुलींच्या शिक्षणाची ज्योत पेटविणाऱ्या मलाला युसूफझाई हिने मुलींच्या शिक्षणरूपी पवित्र यज्ञाचा "वन्ही तो पेटवलाच' ना! त्याच्याही सुमारे अर्धशतकाच्याही आधी तत्कालीन प्रतिगामी महाराष्ट्राच्या भूमीवर प्रसंगी शेण, चिखल, शिव्या यांचा मारा सहन करूनदेखील आपल्या ध्येयापासून जराही न डळमळणाऱ्या सावित्रीबाई व महात्मा फुले यांनीही स्त्रीशिक्षणाचा नंदादीप तेवत ठेवण्यासाठी प्रारंभी 'वन्ही तो पेटवलाच' की! अगदी आजही फक्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाची, यंत्रयुगाची व प्रचंड सुखसोयींची हाव बाळगणाऱ्या प्रतिष्ठित, आंतरराष्ट्रीय नेत्यांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण रक्षणासाठी तसूभरही न डगमगता, एकाकी लढा देणाऱ्या ग्रेटा थंनबर्गने तसेच भारतात गंगा शुद्धीकरणासाठी तसाच लढा देणाऱ्या भारतीय ग्रेटाने पर्यावरण संवर्धनासाठी एक पाऊल उचलत “वन्ही तो पेटवलाच' ना!  याचे सकारात्मक परिणाम हळूहळू नक्की दिसतीलच यात तिळमात्र शंका नाही. या प्रातिनिधिक उदाहरणांव्यतिरिक्त अनेक महनीय व्यक्तींनी आपापल्या वेगवेगळ्या क्षेत्रात वन्ही पेटवण्याचे कार्य करून आपापल्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. आपल्या आजूबाजूला देखील अशा हजारो समस्या आहेत; ज्या दिसतांना अक्राळविक्राळ व महाकाय दिसतात. त्या समस्या सोडवण्यासाठी आपणाजवळ शक्ती नाही, आपण एकटे आहोत, सामान्य घटक आहोत अशा भावना आपल्या मनात येऊ शकतात. पण खरी गरज आहे ती फक्त पहिला प्रयत्न करण्याची. पहिला पाऊल उचलण्याची. एक दिवस त्या समस्या नक्कीच सुटतील. गरज आहे ती फक्त “वन्ही तो पेटवण्याची'!

बातम्या आणखी आहेत...