आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावनिक लाटेवर नव्हे, तर यंदा 5 वर्षांतील कामांवरच हाेणार परीक्षा, मुंडे बहीण-भावात सलग दुसऱ्यांदा रंगणार चुरशीची लढत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंदार जोशी | परळी (बीड) संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या परळी विधानसभा निवडणुकीत मुंडे बंधूू-भगिनींची यंदाही चुरशीची लढत हाेत आहे. विधान परिषद विराेधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे व भाजप नेत्या, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात २०१४ मध्येही कांटे की टक्कर झाली. मात्र गाेपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे सहानुभूतीच्या लाटेवर पंकजा सुमारे २५ हजारांवर मतांनी विजयी झाल्या हाेत्या. त्यानंतर त्यांना राज्यात मंत्रिपदही मिळाले. मात्र या पराभवानंतर खचून न जाता धनंजय मुंडे यांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला. गेल्या ५ वर्षांत राष्ट्रवादीचे राज्यस्तरीय नेते म्हणूनही त्यांनी मान्यता मिळवली. विधान परिषदेत सरकारला वेगवेगळ्या प्रश्नांवर जाब विचारून त्यांनी विराेधी पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले. परळी तालुक्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आज धनंजय यांच्याच समर्थकांकडे आहे. दुसरीकडे पंकजा यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी माेठ्या प्रमाणावर निधी आणल्याचा दावा भाजपचे नेते करतात. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पंकजा यांनी तर राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेतून धनंजय यांनी शक्तिप्रदर्शन केले. दाेन्ही उमेदवार पूर्ण तयारीनिशी मैदानात असल्याचे दिसते. काहीही झाले तरी यंदा सहानुभूतीच्या लाटेवर नव्हे तर पाच वर्षांत केलेल्या कामांच्या जाेरावरच मतदार काैल देणार असल्याचे वातावरण आहे.  अधिक-उणे | ताई-भाऊ यांच्यातील लढाईची राज्यभरात उत्सुकता पंकजा मुंडे : राज्यभर वलय, स्थानिकांत नाराजी सकारात्मक बाजू  : मुंडेंच्या कन्या ही जमेची बाजू. मंत्रिपद, पक्षात माेठे स्थान, जिल्ह्यातील भाजप बळकट केले. केंद्रात व राज्यात सत्ता येणार असल्याने आमदार भाजपचाच हवा, अशी भावना पसरवण्यात यशस्वी. बहीण खासदार. वैद्यनाथ बँक, साखर कारखाना आणि परळी वैद्यनाथ मंदिराच्या कमिटीवर वर्चस्व. मतदारसंघात आणला माेठा निधी.

नकारात्मक मुद्दे : मंत्रिपद व राज्यस्तरीय नेत्याची प्रतिमा सांभाळताना स्थानिक जनतेकडे दुर्लक्ष. निधी आणला पण कामे करण्याबाबत पाठपुरावा करणारी यंत्रणा नाही. राज्यभर वलय पण परळी नगर पालिकेसह तालुक्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अपयश. पाणी प्रश्न आणि बेरोजगारीचे प्रश्न प्रलंबित.

धनंजय मुंडे : दांडगा जनसंपर्क, दुहीचा फटका सकारात्मक बाजू  : स्थानिक पातळीवर दांडगा जनसंपर्क. स्थानिक स्वराज्य संस्था आणि बाजार समिती ताब्यात. ‘माझी लढाई बहिणीविराेधात नाही तर मातीसाठी आहे. आतापर्यंत मुंडेंच्या लेकीला आशीर्वाद दिला आता लेकाला द्या,’ अशी भावनिक साद ते घालतात. पाणी, रोजगार, ऊसतोड कामगारांचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे प्रचारातील मुद्दे.

नकारात्मक मुद्दे : काका गाेपीनाथ मुंडेंना धनंजय यांनी धाेका दिल्याचा राग अजूनही वंजारी समाजातून व्यक्त हाेताे. मराठा नेत्यांचेही विरोधातील राजकारण. त्यामुळे ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असा प्रचार सुरू. जिल्ह्यातील बहुतांश राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही साथ नाही. लाेकसभेलाही एकट्याने लढवला किल्ला.

वंचित आणि काँग्रेसची भूमिका महत्त्वाची 
काँग्रेसचे नेते तथा जिल्हा परिषदेचे सभापती राजेसाहेब देशमुख यंदा वंचितकडून उभे राहण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेसचे नेते पंडितराव दाैंड यांचे पुत्र संजय यांची भूमिकाही महत्त्वाची ठरेल. १९८५ मध्ये पंडितराव दाैंड यांनी गाेपीनाथरावांचा पराभव केला हाेता. त्यांनी आता धनंजय यांना मदत करावी, यासाठी आघाडीचे प्रययत्न सुुरू आहेत. भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड, जनक्रांती सेनेचे अध्यक्ष बबन गिते यांचीही भूमिका महत्त्वाची ठरेल.

जातीय राजकारण : मराठा, वंजारी समाज प्रभावशाली
पूर्वीचा रेणापूर मतदारसंघ आता परळी झाला आहे. १९९७ पासून आतापर्यंत सात वेळा या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी. पाच वेळा स्वत: गाेपीनाथ मुंडे, दाेनदा मुलगी पंकजा. तीन लाख दहा हजार मतदारांपैकी दोन लाख साठ हजार ते सत्तर हजार मतदार मतदान करतात. बहुतांश मुस्लिम आणि मराठा हे काँग्रेसचे पारंपारिक मतदार आहेत. वंजारा समाज पूर्वी एकगठ्ठा भाजपकडे हाेता, मात्र आता मुंडे बंधू-भगिनीत विभागला गेला.

बातम्या आणखी आहेत...