आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडाला शह देण्‍यासाठी सावरगाव घाटात लवकरच स्‍मारक, पंकजा मुंडेंची घोषणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - राज्‍याच्‍या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्‍या भव्‍य स्‍मारकाच्‍या लोकार्पणाची घोषणा केली आहे. येत्‍या दस-याला 18 ऑक्‍टोबररोजी बीडमधील सावरगाव घाट येथे स्‍मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. स्‍वत: पंकजा मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या स्‍मारकाद्वारे पंकजा मुंडेंचा भगवान गडाला शह देण्‍याचा प्रयत्‍न असल्‍याची चर्चा आता रंगू लागली आहे.

 

ट्विटमध्‍ये पंकजा मुंडेंनी म्‍हटले आहे की, 'गणपती विसर्जनानंतर आता चाहूल लागली आहे ती दसरा मेळाव्‍याची. मुंडे साहेबानी सुरु केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कायम ठेवत संत श्रेष्ठ भगवान बाबांच्या आशीर्वादाने त्यांच्याच जन्मस्थळी सावरगाव घाट येथे भगवान बाबांच्या भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार आहे.'  या स्‍मारक स्‍थळाचे नाव सुचवण्‍याचे आवाहनही पंकजा मुंडेंनी लोकांना केले आहे.


दसरा मेळाव्याचा वाद
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामधील भगवानगडावर दसरा मेळाव्यात समर्थकांना संबोधित करायचे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ही परंपरा त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांनी चालू ठेवली. मात्र गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी भगवान गडावर यापुढे दसरा मेळावा होणार नाही. ही जागा राजकारणासाठी नाही, अशी भूमिका 2016 साली घेतली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

 

त्‍यानंतर पंकजा मुंडेंनी अनेकदा भगवान गडावर दसरा मेळावा घेऊ देण्‍याची विनंती नामदेव शास्‍त्री यांना केली होती. मात्र शास्‍त्रींनी प्रत्‍येक वेळी ही मागणी धुडकावून लावली. नंतर वाद ऐवढा विकोपाला गेला होता की, ऐकमेकांना संपवण्‍याची भाषा दोन्‍हीबाजूकडील कार्यकर्त्‍यांनी केली होती. मात्र पंकजा मुंडे यांनी नमते घेत भगवान गडावर न जाता दोन्‍ही वर्षे म्‍हणजे 2016-17 साली गडाच्या पायथ्याशीच सभा घेतल्‍या होत्‍या.


राजकीयदृष्‍ट्या भगवान गड महत्‍त्‍वाचे
बीड तसेच राज्‍याच्‍या राजकारणातही भगवान गडाला अतिशय महत्‍त्‍वाचे स्‍थान आहे. राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड ओळखले जाते. त्‍याचबरोबर बीड जिल्‍ह्यात सर्वाधिक संख्‍येने असलेल्‍या ऊसतोडणी मजुरांचेही ते प्रमुख श्रद्धास्थान आहे. मराठवाड्यासह महाराष्ट्रातील भाविक येथे नियमित येत असतात.

 

 

बातम्या आणखी आहेत...