आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माआधीच बाळाला नकटं ठरवलं जात आहे, बेबी किटवरून पंकजा यांची धनंजय मुंडेंवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई  - राष्ट्रवादीचे नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे या भावा-बहिणीमध्ये सोमवारी नव्या वादाची ठिणगी पडली. महिला व बालकल्याण विभागाच्या ‘बेबी केअर किट’मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना पंकजा यांनी ‘मूल जन्माच्या आधीच ते नकटं आहे, असे सांगण्याची विरोधी पक्षनेत्यांना सवय जडली आहे,’ असा प्रत्यारोप केला.    


त्या मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होत्या.  सॅनिटरी नॅपकीन, चिक्की खरेदी व बेबी केअर किट या त्यांच्या विभागाच्या योजनांचा संदर्भ देत पंकजा म्हणाल्या की, मी काहीही केले तरी ते आरोग्याला हानिकारक असते. खरे तर शेजारच्या राज्यांमध्ये “बेबी केअर किट’ योजना राबवण्यात आली आहे. तेथे ही योजना यशस्वी झाली. तेथे बालमृत्यूचा दरही घटला आहे. मग, मी राबवते म्हणून ही योजना चुकीची कशी काय ठरते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.    
नवजात अर्भकांसाठी सर्व सरकारी रुग्णालयात विनाशुल्क “बेबी केअर किट’ पुरवण्यात येणार आहेत. मंत्रिमंडळाने या योजनेला मान्यता दिली आहे, असे सांगून पंकजा म्हणाल्या, योजना जाहीर झाली की लगेच विरोधी पक्षनेत्यांनी बालकांच्या आरोग्याला किट हानिकारक असल्याचा प्रचार चालू केला आहे. कदाचित विरोधी पक्षनेत्यांनी या योजनेचा शासन निर्णय वाचलेला नसावा, अशी उपरोधिक टीका त्यांनी धनंजय यांच्यावर केली.     

 

अद्याप कंत्राटही निघाले नाही तरी भ्रष्टाचार कसा?  
बेबी किट खरेदी व्यवहारात अनेक गंभीर त्रुटी आहेत, असा आरोप धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावर पंकजा म्हणाल्या, बेबी केअर किट खरेदीचे अद्याप कंत्राट निघालेले नाही. तरीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांना या योजनेत भ्रष्टाचार कसा काय आढळून आला? बेबी केअर किटमध्ये नेलकटर, मच्छरदाणी, लोकरी कपडे, ऊब देण्याची पिशवी, हात धुण्यासाठी लिक्विड, थर्मामीटर, डायपर अशा वस्तू आहेत. या किटमध्ये खाण्याची वस्तू नाही. मग बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा युक्तिवाद कसे काय करत आहेत, अशा शब्दांत पंकजांनी धनंजय यांच्या आरोपांची खिल्ली उडवली.

बातम्या आणखी आहेत...