आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी पक्ष सोडणार नाही, वज्रमूठ धरणार; पक्षाने मला सोडायचे का ते ठरवावे -पंकजा मुंडे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हरिभाऊ बागडे, एकनाथ खडसेंनी दिला गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा
  • चंद्रकात पाटील यांच्या भाषणात गोंधळ नको, पंकजांचे कार्यकर्त्यांना आवाहन

परळी - माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी परळीत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या गोपीनाथ गडावर आयोजित पंकजा मुंडेंच्या या खास कार्यक्रमात त्यांनी पक्ष सोडणार नाही अशी स्पष्टोक्ती केली. सोबतच, त्यांनी भाजपच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत असल्याचे आपल्या भाषणातून स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांपासून मी पदासाठी दबाव टाकत आहे असे आरोप केले जात आहेत. त्याच आरोपांना फेटाळून लावण्यासाठी आपण हा निर्णय घेत आहोत असे त्या म्हणाल्या. सोबतच, आता मी मंत्री किंवा आमदार नाही. त्यामुळे, केवळ सामाजिक काम करणार आहे असे पंकजांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील आणि इतर भाजप नेत्यांनी देखील उपस्थित लावली. यामध्ये हरिभाऊ बागडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंकजाताई एकट्या नाहीत आम्ही सारेच त्यांच्या पाठीशी आहोत असे एकनाथ खडसेंनी स्पष्ट केले.

छोट्या मोठ्या पराभवांनी मी खचणारी नाही -पंकजा मुंडे

  • 1 डिसेंबरला गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाची पोस्ट सोशल मीडियावर लिहिली. त्यापूर्वी माध्यमांवर फक्त संजय राउत होते. परंतु, त्या पोस्टनंतर 12 दिवस या सभेचीच चर्चा राहिली. माध्यमांनी अनेक प्रकारचे तर्क वितर्क काढले. गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय प्रवास त्यांच्या मृत्यूनंतरही कायम आहे. छोट्या-मोठ्या पराभवांनी मी खचणाऱ्यांपैकी नाही. असे सांगताना पंकजा मुंडे यांनी माध्यमांतील सूत्रांचा देखील खरपूस समाचार घेतला आहे.
  • विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर पंकजा मुंडे भाजपमध्ये बंड पुकारणार, पक्ष सोडणार असे वृत्त आले होते. मी काही मागणी केली होती असेही सांगण्यात आले. विरोधी पक्ष नेते पद मिळवण्यासाठी मी दबाव टाकत आहे असे काही सूत्रांनी सांगितले होते. परंतु, मला कुणालकडूनही अपेक्षा नाही आणि मी कुणाला काहीही मागितलेले नाही असे पंकजांनी स्पष्ट केले. याचवेळी पंकजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक सुद्धा केले.
  • मी आता घरी बसणार नाही. आता काम करणार आहे. हातात मशाल घेऊन राज्यभर दौरा करणार आहे. महाराष्ट्रासह मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न आहे. त्यावरही काम करणार आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
  • मी शेतकऱ्यांची महिलांची आणि कष्टकऱ्यांची सर्वांची आहे. मी भाजप सोडणार नाही, तर पक्षातच राहून वज्रमूठ धरणार आहे. पक्षाने मला सोडायचे का हा त्यांनीच निर्णय घ्यावा. मी पक्षातच राहील. असे पंकजांनी स्पष्ट केले.

नाथाभाउंच्या वेदना समजू शकतो -चंद्रकांत पाटील


भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीतच एकनाथ खडसेंनी भाजपवर टीका केली. ही टीका अगदी मुरब्बी राजकारणासारखी घेत चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाउंच्या भावना समजू शकतो असे सांगितले. रोहिणी खडसे यांनी शेवटच्या क्षणी तिकीट देण्यात आले ही गोष्ट सुद्धा त्यांनी मान्य केली. परंतु, झालेल्या गोष्टींवर आता पक्षावर राग काढू नका. त्या चुका पक्षाच्या नाही तर माणसांच्या होत्या. या सर्वातून मार्ग निघेल असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटलांच्या भाषणापूर्वी पंकजा मुंडेंचे समर्थकांना आवाहन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजांच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांच्या भाषणाची सुरुवात होण्यापूर्वी पंकजा मुंडेंनी माइक घेऊन आधी समर्थकांशी संवाद साधला. "चंद्रकांत पाटील यांच्या भाषणानंतर मी बोलणार नाही. मला ऐकायचे असेल तर कृपया चंद्रकांत दादांच्या भाषणात कुणीही काही कमेंट करू नये. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या आदेशाने एक प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत. त्यामुळे, त्या सर्वांचा मान ठेवून शांत राहा. आपण या ठिकाणी मुंडे साहेबांसाठी आलो आहोत हे विसरू नका." असे पंकजा मुंडेंनी सांगितले.

आम्ही सगळेच पंकजा ताईंच्या पाठीशी आहोत -खडसे


पंकजा मुंडे यांच्या सभेत सहभागी झालेले एकनाथ खडसे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच भाजपला घरचा आहेर देण्यास सुरुवात केली. काहीही नसताना माझ्यावर आरोप करण्यात आले. निवडणुकीत आपल्या कुटुंबियांचा पराभव झाला नाही तर पराभव घडवण्यात आला असे थेट आरोप त्यांनी यावेळी बोलताना केले. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये जागा मी दिली होती. परंतु, 5 वर्षे उलटल्यानंतरही अजुनही स्मारकाचे काम झालेले नाही. भाजपने गोपीनाथ मुंडेंच्या स्मारकात दिरंगाई केली असा आरोपही खडसेंनी केला. दरम्यान, जेवढे लोक गोपीनाथ मुंडेंच्या सोबत होते, तेवढेच आणि आम्ही सुद्धा पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहोत. बोलायला भरपूर आहे पण वेळ पुरेसा नाही असे खडसेंनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...