आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

20 तासानंतर अखेर पंकजा मुंडे जनतेसमोर आल्या, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर प्रीतम मुंडेंनी दिली प्रतिक्रिया

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- पंकजा मुंडेंवर आक्षेपार्ह विधान केलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे भावूक झाले. त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष्य लागून होते. शनिवारी घेतलेल्या शेवटच्या सभेत त्यांना भुरळ येऊन पडल्या होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे समोर आल्या आहेत. यावेळी खासदार प्रीतम मुंडेंनी जनतेशी संवाद साधला. मात्र, पंकजा कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून गेल्या.
यावेळी बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्या की, "गोपीनाथ मुंडे आज असते, तर असं बोलण्याची कोणाची हिंमत झाली नसती. स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा सर्वसामान्य महिलांची काय स्थिती असेल. पंकजा मुंडेंनी बीडच्या विकासासाठी काम केलं ही त्यांची चूक झाली का? इतक्या खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याविषयी बोललं गेलेलं ऐकवत नाही. जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांच्याविरोधात कारस्थान झालं, तेव्हा तेव्हा त्या खंबीरपणे त्याला सामोऱ्या गेल्या. त्या कधीही खचल्या नाही. काहीही केलं तरी त्या खचत कसं नाही हीच त्यांची पोटदुखी आहे."पुढे म्हणाल्या की, "टीकेमुळे पंकजा मुंडे सुन्न झाल्या आहेत. तिला ही टीका सहन झाली नाही. पंकजा मुंडेंनी राजकारण सोडावे म्हणून हे होत आहे. पण, त्यांनी राजकारण सोडणं बीडला परवडणारं नाही. असं झालं तर बीडच्या अनेक पिढ्यांचे नुकसान होईल. त्यांनी गोपीनाथ मुंडेंची परंपरा समर्थपणे पुढे नेली आहे", असे मत प्रीतम मुंडेंनी व्यक्त केले.
विशेष म्हणजे पंकजा मुंडेंच्या 'यशश्री' घरासमोर उपस्थित असलेल्या अनेक महिलांनी यावेळी आम्ही पंकजा मुंडे यांच्यासोबत असल्याचं सांगत धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली. दरम्यान, राज्य महिला आयोग धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध सुमोटो दाखल करणार आहे. तसेच ते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे राज्य महिला आयोगाने म्हटले आहे.