आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद - मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे यासाठी आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर माजी मंत्री पंकजा मुंडे उपोषण केले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर या उपोषणाला उपस्थित हेते. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी संध्याकाली 4.30 वाजेच्यादरम्यान हे उपोषण मागे घेतले. उपोषणाची सांगता करताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी भाजप सोडणार या निव्वळ अफवा आहेत. त्याकडे कोणीच लक्ष देऊ नका.
यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, ''मी भाजपा सोडणार या अफवांवर विश्वास ठेवू नका.'' तसेच, यावेळी त्यांनी उपोषणाला पाठिंबा दिल्याबद्दल भाजपच्या नेत्यांची आभारही माणले. कार्यकर्ते सध्या चांगलं वागत आहेत, विरोधात असताना तुम्ही चांगलं वागता का? त्यामुळे विरोधातच बसावं का? असा मिश्किल प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला. नव्या सरकारकडून चांगल्या अपेक्षा आहेत. मी 100 दिवसांत काही त्यांच्यावर टीका करणार नाही असेही पंकजा म्हणाल्या. मी मराठवाड्यात समाजसेविका म्हणून काम करणार. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ठाकरे सरकारने इथला प्राणी प्रश्न सोडवला पाहिजे. तसंच आमच्यापेक्षा चांगलं काम करुन दाखवा असंही आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
दरम्यान उपोषणाच्या सुरुवातीला पंकजा मुंडे म्हणाल्या की, उपोषण सत्तेच्या विरोधात नसून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष जावे म्हणून हे उपोषण करत असल्याच्या पंकजा मुंडे म्हणाल्या. उपोषणस्थळी मराठवाडा पाण्यापासून कसा वंचित राहिला आहे, याचे चित्रप्रदर्शन लावण्यात आले आहे. वॉटर ग्रीड हा महत्वाकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिल्याचही इथे नमूद करण्यात आले आहे.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे
हे उपोषण सत्तेच्या विरोधात नसल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. त्यांची सत्ता येऊन महिना झाला आहे, त्यामुळे त्यांनी लगेच हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा मी करत नाही, मात्र सत्ताधाऱ्यांचे लक्ष या प्रश्नाकडे जावे म्हणून हे उपोषण असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडेही हा प्रश्न मी सातत्याने मांडला असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, ते हा प्रश्न सोडवतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या उपोषणाबाबत खासदार जलील यांचे भाजपवर टीकास्त्र
हे पुढारी लोक नागरिकांना मूर्खात काढत आहे, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते त्यावेळी यांनी काय केले? सरकार गेल्यामुळेच हे नाटक सुरू केल्याचा गंभीर आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. मागील पाच वर्ष तुमचीच सत्ता होती, तुम्ही मंत्रीही होता. त्यामुळे लोक तुमच्या नौटंकीला ओळखतील, अशी टीकाही जलील यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. राज्यात महाआघाडीचे सरकार जाईल आणि आम्हाला संधी मिळेल, त्यावेळी सत्ता नसतानाही आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी कसे रस्त्यावर उतरलो होतो, हे सांगण्यासाठीच भाजपचे हे नाटक असल्याचे खासदार जलील म्हणाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार देखील नाटक असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.