आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद : विधानसभा निवडणूक पराभूत झाल्यानंतर पक्षातील काही लाेकांवर नाराज असलेल्या भाजपच्या नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यापुढे जनतेच्या प्रश्नावर लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला हाेता. त्याचाच एक भाग म्हणून मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर २७ जानेवारी राेजी औरंगाबादेत लाक्षणिक उपाेषण करण्याची घाेषणा त्यांनी केली हाेती. मात्र, हे आंदाेलन भाजपच्या झेंड्याखाली न करता गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हाेते. मात्र, गुरुवारी मुंबईत भाजपच्या काेअर कमिटीची बैठक झाली. त्यात या आंदाेलनात विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आदी प्रमुख नेतेही सहभागी हाेणार असल्याचा निर्णय झाला. एकूणच एकट्या पंकजांना या आंदाेलनाचे श्रेय न जाता ते पक्षाच्या पदरात कसे पडेल याची खबरदारी भाजपकडून घेण्यात आली आहे. शुक्रवारी औरंगाबादेत त्यांच्याच समर्थकांनी पत्रकार परिषद घेऊन या आंदाेलनाची माहिती दिली. यावरून इच्छा असाे वा नसाे, पंकजांना पक्षाचा हा निर्णय मान्य करावा लागल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजप प्रवक्ते शिरीष बोराळकर, आमदार अतुल सावे, मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगरसेविका माधुरी अदवंत आदींनी ही पत्रकार परिषद घेतली. या उपाेषणासाठी तीन जागांची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. स्व. गोपीनाथ मुंडेंनी उपोषण केलेली जागा, दिल्लीगेट परिसर आणि महापालिका आयुक्तांच्या निवास्थानाबाहेरील जागांचा यात समावेश आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सिंचनासाठी निधीची मागणी
राज्याने अमरावती विभागास २०१० पासून आजपर्यंत सिंचन निर्मूलनासाठी ६८९८ कोटी अनुदान दिले. त्याप्रमाणे मराठवाड्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी चालू वर्षापासून एक हजार कोटी देण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केली. खरे तर सिंचनासाठी निधी वाटपाचे सूत्र राज्यपालांनीच ठरवून दिले आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी वेळाेवेळी याचा उल्लेख केला हाेता, मात्र आता ते दुर्लक्षित करून भाजपच्या नेत्यांनीच अशी मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.