आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनाविराेधी रणनीती ठरवण्यात पंकजा मुंडे व्यग्र; उद्धव ठाकरे गाेपीनाथ गडावर नतमस्तक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंगळवारी परळीजवळील गाेपीनाथ गडावर जाऊन समाधीचे दर्शन घेतले. राज्यात सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून सध्या भाजप-शिवसेनेत तेढ निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युतीच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या गाेपीनाथ मुंडेंच्या समाधीवर यानिमित्ताने भाजप-शिवसेनेचे चिन्ह असलेल्या 'बाण- कमळा'ची फुलांतून रांगाेळी साकारण्यात अाली हाेती. यातून युतीत सलाेखा निर्माण हाेण्याचा संदेश देण्यात अाला हाेता.


राज्यात सत्तास्थापनेच्या मुद्द्यावरून भाजप-शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झालेला असताना दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मात्र मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यात व्यग्र अाहेत. मंगळवारी त्यांनी बीड जिल्ह्याचा दाैरा केला. परळीजवळील गाेपीनाथ गडावर जाऊन त्यांनी दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यामुळे युतीत पुन्हा सलाेखा निर्माण हाेण्याच्या दाेन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांच्या अाशा पल्लवित झाल्या. सत्तास्थापनेच्या प्रश्नावर मात्र काहीही प्रतिक्रिया न देता ठाकरे माजलगावकडे रवाना झाले.


दरम्यान, ठाकरे परळीत असताना गाेपीनाथ मुंडेंच्या कन्या तथा ग्रामविकास मंत्री पंकजा या मात्र मुंबईत हाेत्या. मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेच्या रणनीतीला शह देण्यासाठी भाजपच्या काेअर कमिटीने अायाेजित केलेल्या बैठकीत त्या सहभागी झाल्या हाेत्या.


उद्धव ठाकरेंनी मंगळवारी नांदेड, लातूर, परभणी व बीड जिल्ह्याचा दाैरा केला. सायंकाळी सातच्या सुमारास गंगाखेडहून कारने गाेपीनाथ गडावर येऊन त्यांनी समाधीचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासाेबत मंत्री एकनाथ शिंदे, जयदत्त क्षीरसागर, खासदार अनिल देसाई, माजी खासदार चंद्रकांत खैरे, मिलिंद नार्वेकर अादी उपस्थित हाेते. ठाकरे येणार असल्यामुळे मुंडेंच्या समाधीवर धनुष्यबाण व कमळ या दाेन्ही पक्षांच्या बाेधचिन्हांची रांगाेळी काढण्यात अाली हाेती. यातून युतीत पुन्हा सलाेखा निर्माण व्हावा, असे संदेशही देण्यात अाला. युतीच्या प्रमुख शिल्पकारांमध्ये गाेपीनाथ मुंडेंचे महत्त्वाचे स्थान हाेते. या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी गाेपीनाथ गडावर दिलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी बीड जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचे कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. 'मुंडे साहेब अमर रहे'च्या घाेषणाही यावेळी देण्यात अाल्या. मात्र, उपस्थित कार्यकर्त्यांना केवळ अभिवादन करून ठाकरे माजलगावकडे रवाना झाले. राजकीय परिस्थितीवर काेणतेही भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.

हे प्रेम कायम राहाे : पंकजा
ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व खासदार प्रीतम या दाेघीही मंगळवारी मुंबईत हाेत्या. 'उद्धवजींचे प्रत्यक्ष स्वागत करण्यासाठी मी नव्हते, मात्र मी त्यांचे मनापासून स्वागत करते. राजकारणापलीकडे वैयक्तिक जिव्हाळा आपल्या परिवारात नेहमी होता, ते प्रेम सदैव कायम राहो,' असे टि‌्वट पंकजा यांनी केले.

 

बातम्या आणखी आहेत...