आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'आमच्या घरांवर हातोडा मारत आम्हाला बेघर केले जात आहे', ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंच्या पिंपरीतील सभेत गोंधळ

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी- चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आज (13 ऑक्टोबर) थेरगाव येथे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत शहरातील अवैध बांधकामे, रिंग रोड आणि शास्तीकर या मुद्यांवर पंकजा मुंडेंचे लक्ष वेधण्यासाठी रहिवाशांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी, हे लोक दुसऱ्या पक्षाने पाठवल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची थेरगाव येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजा मुंडेंचे भाषण सुरु असताना सभेतील काही तरुण आणि महिला उभे झाले. रिंगरोडचा प्रश्न सुटला पाहिजे. रिंग रोडमुळे अनेकांची घरे बाधित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे असे म्हणतात. इथे मात्र, आमच्या घरांवर हातोडा मारत आम्हाला बेघर केले जात आहे. अवैध बांधकामं, शास्तीकर 100 टक्के रद्द झाला पाहिजे, अशी मागणी सभेला उपस्थित असलेल्या महिलांनी केली. त्यामुळे स्टेजवरील स्थानिक नेते मंडळी अवाक झाले.
हा सर्व प्रकार सुरू असताना, पंकजा मुंडेंनी भाषण सुरुच ठेवले. तुमच्यावर दुसऱ्या पक्षाची छाप आहे, असा आरोप मुंडे यांनी केला. तर आम्ही कोणत्याही पक्षाचे नसल्याचे नागरिकांनी सांगितले. लोकशाहीत हे घडणं अपेक्षित आहे. घराचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मुंडे यांनी सांगितले. यावेळी, पोलिसांनी घोषणा देणाऱ्या या लोकांना ताब्यात घेतले.