आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला पंकजा मुंडे पराभवानंतर प्रथमच साधणार कार्यकर्त्यांशी संवाद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - दिवंगत भाजप नेते गाेपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने १२ डिसेंबर राेजी परळीजवळील गाेपीनाथ गडावर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी विविध कार्यक्रमांचे आयाेजन केले आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर प्रथमच यानिमित्ताने पंकजा मुंडे कार्यकर्त्यांशी व जनतेशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती स्वत: पंकजांनी साेशल मीडियावरील पाेस्टद्वारे दिली. सर्वात माेठा पक्ष बनूनही भाजप सत्तेपासून दूर राहिल्याने आता या पक्षातील सर्वच नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच पंकजा मुंडे यांचा बंधू धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाल्याने पंकजा समर्थक अधिकच अस्वस्थ आहेत. पंकजांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे पुनर्वसन करावे, अशी मागणीही त्यांच्याकडून जाेर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर १२ डिसेंबर राेजी पंकजा गाेपीनाथ गडावर शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मानले जाते. रविवारी (ता. १ डिसेंबर) सकाळी पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट करत 'लोकनेते मुंडे यांच्या जयंतीदिनी गोपीनाथगडावर भेटू' असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या ठिकाणी पंकजा आपले मन मोकळे करणार असून कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहेत. सत्ताबदल झाल्याने पंकजा भाजप साेडणार असल्याच्या वावड्याही उठल्या. मात्र, भाजप सोडण्याचा त्यांचा कुठलाही विचार नसून आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे, नव्या जोमाने पुन्हा कार्य सुरू करणे असा त्यांचा मानस असल्याची माहिती पंकजांच्या निकटवर्तीयांनी दिली.

या पोस्टमध्ये पंकजा यांनी लिहिले आहे की...

नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे...
निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे.


दुसऱ्याच दिवशी पार्टीच्या कोअर कमिटीच्या बैठकीस मी हजरही झाले. 'आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:' हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले.

पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. "ताई आम्हाला भेटायला वेळ द्या," .."ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या "...किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .

मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहील्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे.

बातम्या आणखी आहेत...