Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Pankaja Mundhe attacks on NCP, Congress Sangharsha Yatra in State

जनतेच्या तिजोरीवर डल्ला मारणारांना संघर्ष यात्रा शोभत नाही, पंकजा मुंडेंचा काॅग्रेस-राष्ट्रवादीवर घणाघात

प्रतिनिधी | Update - Sep 07, 2018, 09:44 PM IST

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांचा थाटात शुभारंभ

 • Pankaja Mundhe attacks on NCP, Congress Sangharsha Yatra in State

  अहमदनगर - पंधरा वर्ष ज्या काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्तेत असताना सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारला तेच आता हल्लाबोल व संघर्ष यात्रा काढत आहेत. अशा यात्रा यांना शोभत नाही. कारण यांनी कधी जनतेसाठी संघर्षच केला नाही आणि पाहिलाही नाही. आडवा आणि जिरवा हे धोरण या लोकांनी जनतेसाठीच राबवले, असा घणाघात राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केला. दरम्यान कुणी कितीही यात्रा काढल्या तरी २०१९ मध्ये भाजपचा विकासच जनतेला बोलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  चिचोंडी शिराळ (ता. पाथर्डी) व ढोरजळगांव (ता. शेवगांव) येथे ६४ कोटी रुपयांच्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजना तसेच विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार मोनिका राजळे, आमदार बाळासाहेब मुरकूटे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते सुभाष पाटील, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


  यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, विकास कामांच्या जोरावरच पुढील लोकसभा विधानसभा निवडणूकीला आम्‍ही सामोरे जाणार असुन सत्तर वर्ष ज्यांनी देशावर सत्ता गाजवली ते आता आम्हाला पाच वर्षाचा हिशोब विचारत आहेत. राज्यात तीस हजार कोटींची रस्त्यांची कामे आम्ही पुर्ण केली आहेत. नगर जिल्हयात १३६१ किमीचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार असुन त्यासाठी ७७५ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील १२० किमीचे रस्ते डांबरीकरणाने जोडले जाणार असुन त्यासाठी ६६ कोटी रूपये देणार असल्याचे सांगत आमदार कर्डिले लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे आवडते आमदार होते, यापुढील काळातही त्यांच्या सुख दुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत, असे मुंडे म्‍हणाल्‍या. तसेच आमदार मोनिका राजळे माझी बहीण आहे तीला देखील कशाचीही अडचण भासू देणार नाही, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

  विरोधकांचा घेतला समाचार

  विरोधकांची संघर्ष यात्रा म्हणजे एक बनाव आहे. संघर्ष यात्रेपेक्षा स्टेजवर बसणाऱ्यांची संख्या मोठी असते. संघर्ष लोकनेते मुंडे साहेबांनी पाहिला आणि अनूभवलादेखील. संघर्षाची भाषा विरोधकांना शोभत नाही अशा शब्दात मुंडेंनी विरोधकांवर निशाणा साधला. जलयुक्त शिवारसारखी योजना प्रभावीपणे राबवून आम्ही जनतेला पाणी दिले. राज्य दुष्काळमुक्त करण्यावर आम्ही भर दिला. राष्ट्रवादीने मात्र सत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा करून आडवा आणि जिरवा हे धोरण फक्त जनतेसाठीच राबविले असल्याची टीका त्यांनी केली.


  मुंडे साहेबांचे स्वप्न पूर्ण करायचेय
  लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचे स्वप्न हे त्यांच्या परिवारासाठी नव्हते तर जनतेच्या विकासाचे होते. ते पूर्ण करण्यासाठीच मी आज येथे आहे असे पंकजा मुंडे म्हणाल्या. मुंडेंचा वारस होणे सोपे नाही त्यासाठी लागणारी मेहनत व अपार कष्ट मी आज घेत आहे. बेरजेचं राजकारण करायच त्यांनी मला शिकवल असं सांगून माझं सर्व आयुष्य हे जनसेवेसाठी असल्याचे त्या म्हणाल्या.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ. कर्डीले यांनी केले. सुरवातीला मुंडे साहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. पंकजा मुंडे यांचे गावोगांवी जंगी स्वागत झाले. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी ग्रामस्थ विशेषतः महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 • Pankaja Mundhe attacks on NCP, Congress Sangharsha Yatra in State
 • Pankaja Mundhe attacks on NCP, Congress Sangharsha Yatra in State
 • Pankaja Mundhe attacks on NCP, Congress Sangharsha Yatra in State
 • Pankaja Mundhe attacks on NCP, Congress Sangharsha Yatra in State

Trending